पिंपरी – उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (3) अंतर्गत येणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. 76 पैकी 55 सहकारी संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. डिसेंबर अखेर या प्रक्रिया होतील, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र सध्याची स्थिती पाहता या संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया वेळेत होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (3) अंतर्गत सहकारी संस्थांची नोंदणी होते. सभासद तयार करून संस्थांमार्फत आर्थिक कामकाज केले जाते. या कार्यालयांतर्गत 14 प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश होतो.
या संस्थांमध्ये 250 किंवा त्यापेक्षा अधिक सभासद संख्या असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन या कार्यालयामार्फत केले जाते. निवडणूक प्रस्ताव मागविणे, उमेदवारी अर्ज दाखल करून घेणे, छाननी, निवडणूक आदीसह विविध प्रक्रिया 45 दिवसांच्या आत पूर्ण केली जाते. सहकारी संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका कासवगतीने होत असल्याचे चित्र आहे. या कार्यालयामार्फत कोणतीही कडक कार्यवाही
होताना दिसत नाही.
उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (3) अंतर्गत 76 सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. या पैकी केवळ 7 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्यापपर्यंत पूर्ण झाला आहे. तर 19 संस्थांचा प्रस्तावच अद्याप आलेला नसून उर्वरित 55 सहकारी संस्थांच्या निवडणुका अद्याप बाकी आहेत. या संस्थांकडून प्रस्ताव आल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, असे अधिकारी सांगत आहेत. या संस्थांना निवडणूक प्रस्ताव पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याची समज देणे गरजेचे आहे. मात्र अधिकारीच थंड असल्याने निवडणूक प्रक्रिया देखील रेंगाळल्या असल्याचे चित्र आहे.
19 संस्थांची यादी नाही
सहकारी संस्थांकडून आपल्या उमेदवारांसह सभासदांची यादी आणि निवडणूक प्रक्रियेचा प्रस्ताव कार्यालयासमोर ठेवला जातो. त्यानंतर निवडणुका जाहीर होतात. मात्र काही संस्थांची यादीच प्राप्त झाली नाही. अनेक तांत्रिक गोष्टी चुकीच्या असल्याने पुन्हा दुरूस्तीसाठी यादी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. एक संस्था कार्यालयाच्या हद्दीबाहेर आहे. तर उर्वरीत एक संस्था अवसायानात काढण्यात आल्याने त्याच्याही निवडणूक प्रक्रिया थांबल्या आहेत.