- आकुर्डीतील नामांकित रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात; औषध प्रशासनाकडून दखल
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात रेमडसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा गैरफायदा शहरातील काही नामांकित रुग्णालयाकडून उचलला जात आहे. आकुर्डीतील एका नामांकित रुग्णालयाने कोविड रुग्णाच्या नातेवाईकाला काळ्या बाजारात इंजेक्शन घेण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याची दखल आरोग्य मंत्रालयासह औषध प्रशासनाने घेतली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आकुर्डी येथील एका नामांकित रुग्णालयाच्या मेडिकलकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा परवाना आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याची चर्चा रंगली होती. आता करोना बाधिताच्या नातेवाईकानेच याबाबत तक्रार दिल्याने इंजेक्शनच्या काळ्याबाजारावर शिक्कामोर्तब झाले आहे. एका रुग्णाला रेमडेसीवीरची गरज असल्यामुळे सदर रुग्णाच्या नातेवाईकाने आकुर्डीतील नामांकित रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये चौकशी केली
मात्र इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर संबंधिताचा क्रमांक घेऊन चढ्या दराने इंजेक्शन मिळेल असा निरोप दिला.
इंजेक्शनबाबत गैरप्रकार सुरू असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाने एका नगरसेविकेच्या मुलाला सांगितले. यानंतर संबंधित विक्रेत्याला एका ठिकाणी इंजेक्शन घेऊन बोलाविण्यात आल्यानंतर त्याला धरून ठेवण्यात आले. यानंतर पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत बराचवेळ काथ्याकुट सुरू होता. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर अथवा संबंधित रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, रुग्णाच्या नातेवाईकाने तसेच नगरसेविकेच्या मुलाने महापालिकेच्या आरोग्य विभागालाही याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार औषध प्रशासनाला कळविण्यात आला असून त्यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर आरोग्य मंत्रालयाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली असून त्याठिकाणीही दखल घेण्यात आल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. याबाबत औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.