पिंपरी – “खोटं बोला पण रेटून बोला’ ही परंपरा महापालिकेत निर्माण करणाऱ्या भाजपाच्या काही वाचळवीरांचा चांगलाच फटका महापौर माई ढोरे यांच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला बसला. वाचाळवीरांमध्ये गणले जाणाऱ्या सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केलेली टीका भाजपाच्या चांगलीच अंगलट आली आहे. ढाके यांच्या टीकेनंतर मावळातील शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेनंतर पवना धरणाच्या जलपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर ओढावली आहे.
पवना धरण शंभर टक्के भरल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो. महापौरांच्या हस्ते जलपूजन होण्यापूर्वीच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि.30) जलपूजन केले. या कार्यक्रमानंतर श्रीरंग बारणे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली होती.
वर्षभर पाणी पुरेल एवढे पाणी धरणात असतानाही शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. काही भागात तर टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. दररोज पाणी देऊ शकत नसताना चोवीस तास पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. त्यातून करदात्यांच्या पैशांचा अपव्यय सत्ताधारी भाजप करत असल्याचे बारणे यांनी म्हटले होते.
महापौरांच्या आधी शिवसेनेच्या खासदारांनी केलेले जलपूजन पालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिव्हारी लागले. यावर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी खासदार बारणे यांच्यावर टीका केली होती. जलपूजन करून खासदार महापौरांचा अपमान करत आहेत. पिंपरी चिंचवड शहराचे प्रथम नागरिक म्हणून जलपूजन करणे हा महापौरांचा अधिकार असताना त्यांच्या आधी जलपूजन करणे हा खासदारांचा प्रसिद्धी स्टंट असल्याचेही ढाके म्हणाले होते. एवढ्यावर न थांबता ढाके यांचा वाचाळपणा आणि शिवसेनेवर टीका सुरूच ठेवली.
त्यातच ढाके हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवरही खोटी टीका करत असल्याचा राग शिवसैनिकांमध्ये होता. महापालिकेने धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे केलेले दूर्लक्ष, पाणी प्रश्न यावरून मावळातील शिवसैनिकांनी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते जलपूजन होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका घेत भाजपाला चांगलाच धक्का दिला.
मावळ तालुक्याचे शिवसेना तालुका उपप्रमुख अमित कुंभार यांनी महापौरांना जलपूजन करू देणार नसल्याची भूमिका घेतली. बारणे यांनी चार वर्षात 110 क्यूबिक मीटरपेक्षा जास्त गाळ काढला आहे. दरवर्षी ते जलपूजन करतात. त्यामुळे यंदाही त्यांनी जलपूजन केले यात गैर काय, त्यामुळे टीका करणाऱ्यांना आम्ही जलपूजन करू देणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी जलपूजनास आले तर त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा कुंभार यांनी दिला होता.
शिवसेनच्या भूमिकेचा धसका घेत सत्ताधाऱ्यांनी नियोजित जलपूजनाचा कार्यक्रमच रद्द केला. मागीलवर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे जलपूजन करण्यात आले नव्हते. तर यंदा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केलेल्या टीकेमुळे महापौरांना जलपूजन करता आले नाही. सत्तारुढ पक्षनेत्यांच्या वक्तव्याचा महापौरांनाही फटका बसल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेने उपस्थित केलेले मुद्दे
टीका करण्यापेक्षा महापालिकेने धरणासाठी किती रुपयांची तरतूद केली. पवना धरणग्रस्तांच्या किती मुलांना नोकऱ्या दिल्या. पालिकेने धरणग्रस्तांच्या गावांसाठी किती नागरी सुविधा उपलब्ध केल्या हे अगोदर जाहीर करावे. धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना जलपूजन करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यातच प्रखर आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे पुढेही जलपूजन होण्याची आशा मावळली आहे.