पोटच्या तीन मुलांना संपवून आईचीही आत्महत्या

भोसरीतील हृदयद्रावक घटना

पिंपरी – फळविक्रीच्या व्यवसायात पतीला वारंवार येत असलेल्या अपयशाला कंटाळून 28 वर्षीय महिलेने पोटच्या तीन मुलांना गळफास लावला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत मृत्यूला कवटाळले. भोसरीतील प्रियदर्शनी शाळेजवळ रविवारी (दि. 28) सायंकाळी चारच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली. पतीच्या अपयशाचे खापर स्वत:वर घेत महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलेले असेल? याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

फातिमा अक्रम बागवान (वय 28, रा. प्रियदर्शनी शाळेजवळ, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. फातिमा हिने आत्महत्येपूर्वी मुलगी अल्फीया (वय 9), झोया (वय 7) आणि सहा वर्षांच्या जिआन याला एकाच दोरीने फास दिला. अलफिया ही चौथी, झोया दुसरी, तर जिआन पहिलीत शिक्षण घेत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान कुटुंब हे मूळचे कर्नाटकचे. उदरनिर्वाहासाठी गाव सोडले आणि पुण्यात आले. फातिमा हिचा पती अक्रम हा तळेगाव दाभाडे येथे फळविक्रीचा व्यवसाय करीत होता. मात्र त्याला व्यवसायात फारसे यश मिळत नव्हते. सततच्या अपयशामुळे बागवान कुटूंबाने तळेगावही सोडले आणि भोसरीतील न्यू प्रियदर्शनी शाळेशेजारी नूर मोहल्ला परिसरात वास्तव्यासाठी आले. त्यांना भोसरीत येऊन अवघे चार दिवसच झाले होते.

भोसरीत वास्तव्यास आल्यानंतर अक्रम बागवान काम शोधत होता. रविवार असला तरी फातिमाने नोकरी शोधाण्यासाठी अक्रमला घराबाहेर पाठविले. तो कामाच्या शोधात सकाळी साडेदहाच्या सुमारास बाहेर गेला. अक्रम गेल्यानंतर फातिमा हिने मोठी मुलगी अल्फीया, धाकटी झोया आणि मुलगा जिआन या तिघांनाही दोरीने गळफास लावला. पोटच्या तीनही मुलांचा श्‍वास संपल्यानंतर फातिमा ही दुसऱ्या खोलीत गेली आणि तिने ओढणीच्या सहाय्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीसही झाले सुन्न…

फातिमा हिने पोटच्या तीन मुलांना संपवून स्वतः आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बागवान यांच्या घराची तपासणी केली, परंतु त्यांना संशयास्पद काही सापडलेले नाही. बागवान कुटुंब मूळचे कर्नाटक येथील असल्याने त्यांचे नातेवाईक आणि पुण्यातील मित्र-मंडळी यांच्याकडे चौकशी होईल. त्यानंतरच या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे पोलीस सांगत आहेत. मात्र दरवाजातून आत गेल्यानंतर एकाच हुकाला तीन मुलांचे लटकलेले पाहून पोलिसही सुन्न झाले.

दरम्यान, सायंकाळी चार वाजता अक्रम घरी आल्यावर त्याने दरवाजा वाजविला. बराच वेळ आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्याला संशय आला. त्याने तात्काळ पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला. एका खोलीच्या छाताच्या एकाचा हुकाला अल्फीया, झोया आणि जिआन हे तिघे लटकलेले दिसले. तर दुसऱ्या खोलीत फातिमा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)