वायसीएममध्ये एका महिन्यात 400 शस्त्रक्रिया पूर्ण
गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांना दिलासा : ग्रामीण भागातून दाखल होऊ लागले रुग्ण
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात कोविडचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहे. शहरातील महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय नॉन कोविड करण्यात आले आहे. त्यामुळे हळूहळू या रुग्णालयामध्ये इतर आजरांच्या रुग्णांची वर्दळ वाढली आहे. करोना काळात वायसीएममध्ये सुमारे सात महिने विविध आजारांवरील शस्त्रक्रिया बंद होत्या. त्या 3 नोव्हेंबर पासून सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील इतर आजाराच्या गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरामध्ये आतापर्यंत 92 हजारांहून अधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत. शहरात करोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यामध्ये आढळला. त्यानंतर शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेने वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून फक्त करोनाच्या रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. या काळात अत्यावश्यक वगळता सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
त्याचा परिणाम शहरातील इतर आजार असलेल्या रुग्णांवर झाले. त्यामुळे वायसीएम नॉन कोविड केले जावे याबाबत शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनीही वेळोवेळी मागणी केली होती. अखेर 2 नोव्हेंबरपासून पालिका प्रशासनाने वायसीएम रुग्णालय 50 टक्के नॉन कोविड केले. त्यानंतर 3 नोव्हेंबरपासून रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियांना सुरूवात झाली. करोनाच्या काळामध्ये ज्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रुग्णालयामध्ये दररोज 15 ते 17 शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये मोतीबिंदू, दंत, कान नाक घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. गेल्या 26 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये 400 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यामध्ये करोनाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण काहीशे वाढले आहे. मात्र ही रुग्णसंख्या मे ते सप्टेंबर या महिन्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयातील खाटा रिकाम्या आहेत. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
ग्रामीण भागातूनही रुग्ण दाखल
वायसीएम रुग्णालयामध्ये राज्याच्या काना-कोपऱ्यातून रुग्ण येत असतात. पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून वायसीएम रुग्णालयाची ओळख आहे. रुग्णालय नॉन कोविड केल्याने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. गेले सात महिने रुग्णालय कोविड समर्पित असल्याने या रुग्णांची गैरसोय होत होती. मात्र आता रुग्णालय सुरळीत सुरू झाल्याने जिल्ह्यातील जुन्नर, मावळ, खेड, आंबेगाव, शिरूर या ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
वायसीएममध्ये शस्त्रक्रिया सुरळीत सुरू झाल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये रुग्णालय करोना समर्पित केल्याने अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या शस्त्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. दररोज 15 ते 17 शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये काही तातडीच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.