पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – वाहतूक नियमन करणारे पोलीस, चौकीत काम करणारे पोलीस, भांडण सोडविण्यासाठी गेलेले पोलीस, गुंडांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या नागरिकांच्या रोषाला सामोरे गेले आहेत. इतर सरकारी नोकरांवरील हल्ल्यांच्या तुलनेत पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे नागरिकांचा सर्वाधिक रोष हा खाकीवर असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षात पोलिसांवर 27 तर इतर सरकारी नोकरांवर 10 हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
वाहतूक नियमन करताना पोलिसांसोबत हुज्जत घालून त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला जातो. काही वेळेला वाहतूक पोलिसांवर हातही उचलला जातो. चौकीत काम करणाऱ्या पोलिसांना दमदाटी करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना त्रास दिला जातो. तडीपारी सारखी प्रतिबंधात्मक कारवाई केलेले गुंड परवानगी शिवाय शहरात येतात. त्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या गुंडांवर कारवाई करण्यासाठी जातात. अशा वेळेला हे गुंड थेट पोलिसांवर शस्त्रे घेऊन धावून येतात. पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देतात.
एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल
पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुरुवारी (दि. 22) पिंपरी आणि सांगवी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रार देण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराची तक्रार घेऊ नका, असे म्हणत तिघांनी सहायक पोलीस फौजदारावर दबाव आणला. सहायक फौजदाराला तुझी नोकरी घालवतो, अशी धमकी देत कामात अडथळा निर्माण केला. पिंपरी मधील साई चौकात वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी ई चलनाची कारवाई केली. त्यावरून चिडलेल्या रिक्षा चालकाने आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
तडीपार गुंडाकडून वारंवार हल्ले
तडीपार गुंड शहरात येऊन वास्तव्य करत असल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. पोलीस पकडण्यासाठी आल्यानंतर तडीपार गुंडांकडून पोलिसांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. नुकतेच आकाश ऊर्फ भावड्या भारत कुदळे (वय 27, रा. दळवीनगर, चिंचवड) याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आल्याने चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस आकाशवर कारवाई करण्यासाठी गेले असता आकाशने पोलीस शिपायाला मारहाण केली. मोशी येथे एका मद्यपीने पोलिसाच्या कानशिलात लगावली. पिंपळे गुरव येथे सराईत पोलिसांच्या अंगावर कोयता घेऊन धावल्याची घटना घडली आहे.
पोलीस चौकीवर दगडफेक
दहा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने केले. जीव वाचविण्यासाठी तरुण काळेवाडी पोलीस चौकीत गेला. त्यानंतर टोळक्याने थेट पोलीस चौकीवर दगड फेकून मारले.
महावितरण कर्मचारीही होताहेत टार्गेट
महावितरण विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्यावर देखील नागरिकांचा रोष वाढत आहे. वीज कनेक्शन कट केल्याने महावितरणच्या सहायक अभियंत्याला कार्यालयात जाऊन मारहाण करण्यात आल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. लघुदाब वाहिनीवर आकडी टाकून चोरून वीज वापरली. याबाबत वायरमनने विचारणा केली असता चोरून वीज वापरणा-याने वायरमनला मारहाण केल्याची घटना राक्षेवाडी, चाकण येथे घडली. विविध भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.
वर्षपोलिसांवरील हल्लेइतर शासकीय सेवकांवरील हल्ले
20193222
20204109
20217820
2022
(ऑगस्ट पर्यंत)27 10