पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – हल्ली घर, दुकान, व्यवसाय, शाळा, विविध आस्थापनांमध्ये निगराणीसाठी सीसीटीव्ही वापरला जातो. सीसीटीव्हीला आपला तिसरा (स्मार्ट) डोळा असेही म्हटले जाते. सर्वत्र दिसणारे सीसीटीव्ही काम करत आहेत की केवळ दिखावा म्हणून अडकवले आहेत, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. हा तिसरा डोळा बंद पडल्यास अनेक गैरप्रकार घडण्याचा धोका आहे. पिंपरी येथील लहान मुलाच्या अपहरण आणि खून प्रकरणातील सोसायटीमध्ये केवळ दोन सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. अन्य कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने पोलिसांना तपासात अनेक अडथळे आल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महापालिका आणि नागरिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात तरी देखील शहरात रोज वाहनचोरी, चेन स्नॅचिंग, मोबाइल हिसकावणे असे गुन्हे घडतच आहेत. त्याचप्रमाणे अपहरण आणि खून असे गंभीर गुन्हेही होत आहेत. या गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना गजाआड करण्याचे प्रमाण वाढल्यास गुन्हेगारी कमी होऊ शकते. यासाठी पोलिसांना मदत हवी असते ती सीसीटीव्हीची. परंतु शहरातील अनेक सीसीटीव्ही केवळ दिखाव्यापुरते असल्याचे दिसून येत आहेत.
पिंपरी येथे एका सोसायटीमधून एका सात वर्षीय मुलाचे अपहरण केले. मुलाचा खून करून मृतदेह भोसरी एमआयडीसी मधील एका कंपनीच्या टेरेसवर टाकला. मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता एक भयानक सत्य समोर आले. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही सुद्धा बंद असल्याचे आढळले. भल्या मोठ्या सोसायटीमधील केवळ दोन सीसीटीव्ही कॅमेरे सुरु होते. त्यामुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटविणे, त्यांचा माग काढण्यासाठी अनेक अडथळे आले. आश्चर्याची बाब अशी की, याच सोसायटीमध्ये एक आठवडाभरापूर्वी घरफोडी झाली होती. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी सोसायटीला भेट देऊन तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून घेण्याच्या सूचना पिंपरी पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.
पिंपरी येथे एका सोसायटीमध्ये घरफोडी झाली होती. तेंव्हा पोलिसांनी सोसायटीमध्ये जाऊन सीसीटीव्ही बसविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. बसवलेले सीसीटीव्ही सुस्थितीत असल्याची खात्री करण्याबाबत देखील सांगितले होते. मात्र तरीही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी यावर काम केले नाही. परिणामी लहान मुलाच्या अपहरण आणि खून प्रकरणात तपास करताना पोलिसांना अडचणी आल्या होत्या. सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटींमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी.
– शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे.
सोसायट्यांच्या सुरक्षेसाठी हे करा
चांगल्या दर्जाचे आधुनिक सीसीटीव्ही बसवा
नोंदणीकृत एजन्सीचे
सुरक्षा रक्षक नेमा
सुरक्षा रक्षकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करा
अभ्यागतांची नोंद ठेवा
अभ्यागतांच्या
वाहनांची नोंद ठेवा
पोलीस गस्त वाढविणे
पिंपरी-चिंचवड शहर दृष्टीक्षेपात
शहराची लोकसंख्या
– सुमारे 27 लाख
सोसायट्या – 5 हजार
कंपन्या – तीन हजार 804
शाळा, महाविद्यालये
– सुमारे 700
झोपडपट्ट्या – 71