पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या नेत्यांकडून दांडी मारली जात असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा जोरावर होत्या. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांची सातत्याने अनुपस्थिती पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना बळ देत होती. परंतु बुधवारी (दि.5) अजित पवार यांच्या संवाद सोसायटीधारकांशी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व नेते उपस्थित होते. तसेच आमदार अण्णा बनसोडे देखील उपस्थित होते. यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.
शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सोसायटीधारकांशी थेरगाव येथे सोसायटीधारकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहर राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमापासून आमदार अण्णा बनसोडे गेल्या काही दिवसांपासून दोन हात लांब राहत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आढावा बैठकीलाही ते अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार बनसोडे हे पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा शहरातील राजकीय वतुर्ळात सुरू होती. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बनसोडे यांची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती. मात्र, बनसोडे यांनी बुधवारी झालेल्या संवाद सोसायटीधारकांशी कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावत शहर राष्ट्रवादीमध्ये एकजूट असल्याचे दाखवून दिले.
शहरातील सोसायटी धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे आणि माजी नगरसेविका माया बारणे यांनी पुढाकार घेतला. याची सुरुवात थेरगावातून झाली आहे. या संवाद कार्यक्रमाला शहराच्या विविध भागातील सोसायटीधारक आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संतोष बारणे आणि माया बारणे यांनी केले, याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले.