विधानसभा चाचपणीसाठी आज भोसरीत चर्चा; प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
पिंपरी – महापालिका व लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या झालेल्या सलग दोन पराभवांमुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शहराची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (दि. 6) भोसरीतील हॉटेल पर्लमध्ये आयोजित केली आहे. या बैठकीत शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातील रणनितीवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या वक्तव्याकडे लक्ष
राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण आले होते. तसेच शरद पवार यांचा नातू पार्थचा मावळातील दारूण पराभव हे दोन्ही विषय पक्षाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शरद पवार यांनी जातीने पक्षसंघटनेत लक्ष घातले आहे. या दोन्ही विषयांबाबत ते कोणती भूमिका घेत आहेत याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
बैठकीला अजित पवार राहणार अनुपस्थित
राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरावर माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची चांगली पकड आहे. मात्र, पार्थच्या पराभवानंतर ते शहरात अद्यापही फिरकले नाहीत. उद्या होणाऱ्या शहर पातळीवरील बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शरद पवार यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा हाती घेतल्याने ते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने ते त्याठिकाणी जाणार असल्याने या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची दिवसें-दिवस पिछेहाट होत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थचा मावळ लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणखी सैरभैर झाले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाला उभारी देण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी या तीनही मतदार संघात जातीने लक्ष घालण्याचे मनावर गेतले आहे. राष्ट्रवादीचे आजी- माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तीनही मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. भोसरी एमआयडीसीतील हॉटेल पर्ल येथे सकाळी नऊ ते बारा या वेळेत ते या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांचा विजय झाला आहे. त्यांचा सन्मान करण्याच्यादृष्टीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 3) शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. यावेळी शिरूर आणि मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कामगिरीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मावळ लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागा, असे आदेश पवार यांनी यावेळी दिले आहेत.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यासाठी खुद्द शरद पवार गुरूवारी तीनही मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी साडे नऊ ते बारा या अडीच तासाच्या सत्रात प्रथम शिरूर लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार पक्षाचा आढावा घेतला जाणार आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे डॉ.अमोल कोल्हे विजयी झाले असले, तरीदेखील पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला आहे. हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणती खबरदारी घ्यायला हवी, कोणती रणनिती असेल, त्यादृष्टीने मोर्चेबांधणी कशी केली पाहिजे या बाबींवर या बैठकीत अधिक भर देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.