Pimpri Chinchwad – शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरातील उड्डाणपुलांच्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन उभारण्यासाठी साचे बसविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये रोपेच लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, हे साचे आता बेकायदा जाहिरातींचे फलक बनले असून शहराच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी विद्रुपीकरण होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे फुकट्या जाहिरातदारांनी या जागांवर कब्जा केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उड्डाणपूल, तसेच मेट्रो मार्गावरील अनेक खांबांवर व्हर्टिकल गार्डनसाठी संरचना उभारण्यात आल्या. शहरात हिरवळ वाढावी, काँक्रीटच्या जंगलात पर्यावरणपूरक संदेश जावा आणि मेट्रो मार्ग आकर्षक दिसावा, हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ साचे उभारून काम अर्धवटच सोडण्यात आले. अनेक महिन्यांपासून या साच्यांमध्ये एकही रोप लावण्यात आलेले नाही. याचा फायदा घेत खासगी क्लासेस, इव्हेंट्स, प्रॉपर्टी, राजकीय शुभेच्छा संदेश आणि विविध व्यावसायिक जाहिराती या संरचनांवर चिकटविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर एकावर एक जाहिराती लावून खांबांचे स्वरूप पूर्णपणे विद्रूप झाले आहे. शहर स्मार्ट बनविण्याच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाला हे दृश्य दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, शहरात अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिराती हटविण्यासाठी महापालिका वेळोवेळी मोहीम राबवत असल्याचा दावा करते. आकाशचिन्ह विभागाकडून कारवाईची आकडेवारीही जाहीर केली जाते. मात्र, मेट्रोच्या मुख्य मार्गावरील खांबांवर खुलेआम लावलेल्या जाहिरातींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. महापालिका आणि महामेट्रो प्रशासनाने तातडीने या बेकायदा जाहिराती हटवाव्यात, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी आणि प्रत्यक्षात व्हर्टिकल गार्डन विकसित करून शहराचे सौंदर्य वाढवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. “शहरात जाहिराती करून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येते. असे कोणी बेकायदा पोस्टर लावले असतील तर महापालिकेकडे तक्रार करावी, कारवाई करण्यात येईल.” – राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका