पिंपरी-चिंचवड 89.9 @

बारावीचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच मारली बाजी
मुले एकूण विद्यार्थी मुली
मुले – 85.84 टक्के

मुली – 93.01 टक्के

पिंपरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर झाला. बारावीच्या परिक्षेत पिंपरी-चिंचवडचा शहराचा निकाल 89.09 टक्के लागला आहे. या परिक्षेत पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्‍यात यंदाच्या निकालातही मुलींनी विजयाचा झेंडा फडकविला आहे. त्यामध्ये, मुलींचे प्रमाण 93.01 टक्के व मुलांचे प्रमाण 85.84 टक्के एवढे आहे. लवकरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये गुणपत्रक मिळणार आहेत.

राज्यभरात बारावीच्या निकालाची उत्कंठा विद्यार्थ्यांसह पालकांना लागली होती. निकाल असल्याने सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. दुपारी एक वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला. कला, वाणिज्य आणि विज्ञान आणि तंत्रशिक्षण अशा शाखांसाठी विद्यार्थी परिक्षेस बसले होते. परिक्षेचा निकाल पाहून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शहरातील अनेक शाळांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामुळे, निकाल जाहिर झाल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तर मित्रांच्या गर्दीत जल्लोषाचे वातावरण दिसून आले.

बारावीच्या परीक्षेला पिंपरी-चिंचवड शहरातून एकूण 17 हजार 474 विद्यार्थी बसले होते. त्यात मुले 9546 असून, मुलींची संख्या 7928 आहे. त्यापैकी 8194 मुले, तर 7374 मुली असे एकूण 15 हजार 568 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची टक्केवारी 85.94 असून, मुलींची टक्केवारी 93.01 आहे. या व्यतिरिक्त गेल्या वर्षी अनुत्तीर्ण झालेले पुन्हा परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 20.41 टक्के लागला असून गतवर्षी पुर्नपरिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल 38.35 टक्के लागला होता. यामुळे, पुन्हा परिक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे अठरा टक्‍यांनी घट झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 100 टक्के निकालात 17 महाविद्यालयांची घट
शहर व ग्रामीण भागातील 30 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी 47 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला होता. यामुळे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 100 टक्के निकालात 17 महाविद्यालयांची घट झाली आहे. यामध्ये, मावळचा मुलांचा निकाल 84.93 टक्के, तर मुलींचा निकाल 91.95 असा लागला आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबर मावळ, हवेली, मुळशी व खेड या तालुक्‍यात मिळून एकूण 223 महाविद्यालये आहेत. यामध्ये, पिंपरी-चिंचवड शहरात 82, हवेली तालुक्‍यात 62, मावळ तालुक्‍यात 33, मुळशी तालुक्‍यात 15 तर खेड तालुक्‍यात 31 कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

महाविद्यालये, सायबर कॅफेत गर्दी
राज्यभरात बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. या निकालाची उत्कंठा विद्यार्थ्यांसह पालकांनाही लागली होती. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील महाविद्यालये, विविध कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक उत्तीर्ण विद्यार्थी गुणपत्रिका पाहताच जल्लोष करताना दिसून आले. याचबरोबर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांच्याही चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता.

शहरातील निकालात दीड टक्‍यांची घसरण
बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, खेड, मुळशी व मावळमध्येही मुलींनी बाजी मारली आहे. मात्र, यंदा पिंपरी-चिंचवडचा शहराचा निकाल 89.09 टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीच्या परिक्षेचा शहराचा निकाल 90.87 टक्के लागला होता. मात्र, यंदा गतवर्षीच्या तुलनेत निकालात दीड टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पर्नपरिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल यावर्षी तब्बल 18 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. गतवर्षी 38.35 टक्के निकाल होता तर यावर्षी केवळ 20.41 विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत.

शंभर टक्‍के यश मिळविणारी कनिष्ठ महाविद्यालये
-जयहिंद कनिष्ठ महाविद्याल, पिंपरी
-श्री स्वामी समर्थ ज्युनिअर कॉलेज, भोसरी
-के. जी. गुप्ता कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड स्टेशन
-मॉडर्न हायस्कूल यमुनानगर -निगडी
-श्रीमती संजूबेन एस. अजमेरा हायस्कूल, पिंपरी
-एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय मोरवाडी – पिंपरी,
-सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल, निगडी
-निर्मल बेथनी, काळेवाडी
-अमृतानंदमयी विद्यालय, निगडी यमुनानगर
-होरायझन इंग्लिश मीडियम स्कूल, दिघी
-पी. बी. जोग हायस्कूल चिंचवड,
-क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल आकुर्डी,
-एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय, चिखली.
-संचेती कनिष्ठ महाविद्यालय थेरगाव – चिंचवड
-सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय, रावेत.
-पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.