पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील उपनिबंधक सहकारी संस्थांनी नोंदणी करताना दिलेला पत्ताच सापडत नाही. केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खोटे पत्ते दिल्याचे कार्यालयाने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. उपनिबंधक सहकारी संस्था 3 अंतर्गत 69 सहकारी संस्था अशा आढळल्या आहेत. या संस्थांना कार्यालयाकडून अंतरिम नोटीस पाठविण्यात आल्या असून 30 दिवसांत उत्तर न आल्यास या संस्थाच नसल्याचे सिद्ध होणार आहे. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई कार्यालयाकडून केली जाणार आहे.
शासकीय आणि वैयक्तिक लाभ घेण्यासाठी अनेक जण सहकारी संस्थांची नोंदणी करत आहेत. त्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्थांकडे आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी केली जाते. संस्थेचा पत्ता दिला जातो. उपनिबंधक सहकारी संस्था तीन अंतर्गत 3 हजार 904 सहकारी संस्थांची नोंदणी झालेली आहे. या कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी आदी परिसराचा समावेश होतो. कार्यालयाच्या वतीने दरवर्षी संबंधित पत्त्यावर सर्व्हेक्षण केले जाते. त्यामध्ये संस्थांचे कामकाज सुरू आहे का, हे तपासले जाते.
सहकार आयुक्तांच्या सुचनेनुसार उपनिबंधक कार्यालय पुणे शहर 3 कार्यालयाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले. डिसेंबर अखेर हे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यानुसार 31 मार्च 2022 अखेर 69 संस्थांचे पत्तेच सापडले नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळले आहे. या संस्था अवसायानात काढल्या आहेत. त्यांना अंतरिम नोटीस पाठविण्यात आली आहे. 30 दिवसांत उत्तरे न दिल्यास या संस्थांची नोंदणी रद्द केली जाणार आहे.
कार्यालयाकडून सर्व्हेक्षण केला आहे. यामध्ये काही संस्थांचे पत्तेच सापडलेले नाहीत. त्यांना आम्ही नोटीस पाठवली आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. त्याबाबत उत्तर न आल्यास संस्था बंदची कारवाई करू.
– पंकज राऊत, जनमाहिती अधिकारी, उपनिंबधक सहकारी संस्था
14 प्रकारच्या सहकारी संस्था
उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (3) कार्यालयांतर्गत 14 विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश होत आहे. यामध्ये गृहनिर्माण सहकारी संस्था (शहरी) यांची 3 हजार 570 सर्वाधिक नोंद आहे. या बरोबरच शहरात नागरी सहकारी बॅंकांची संख्या 8, नोकरदार सहकारी पतसंस्था 33, इतर नागरी सहकारी पतसंस्था शहरी 110, औद्योगिक सहकारी संस्था 14, प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था 10, सभासद ग्राहक संस्था 3, इतर सर्वसाधारण सहकारी संस्था 86, मजूर सहकारी संस्था 23, इतर सहकारी संस्था स्वयंरोजगार 50 नोंद आहे. औद्योगिक वसाहती सहकारी संस्था, मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था, वाहतूक सहकारी संस्था, पाणी पुरवठा सहकारी संस्थाची एकही नोंद नाही.