पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आवश्यक औषधोपचार आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे दाखल 416 करोनाबाधित रुग्णांपैकी आत्तापर्यंत 212 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. टक्केवारीत हे प्रमाण 51 टक्के इतके आहे.
शुक्रवार (दि. 29) सायंकाळपर्यंत वायसीएम रुग्णालयात एकूण 416 “करोनाबाधित’ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले होते. त्यातील 212 रुग्ण उपचार होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, रुग्णालयामध्ये आज दुपारपर्यंत 289 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील 216 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 12 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. 8 जणांचा “स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्याचे नियोजित होते. तर, 53 रुग्णांचा करोना चाचणीचा अहवाल प्रलंबित आहे.
उपचार व पुरेशी दक्षता ….
रुग्णालयात करोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक औषधोपचार व अन्य सुविधा देण्यात येत आहेत. रुग्णांना सकाळची न्याहरी, दुपारचे जेवण, सायंकाळचा चहा आणि रात्रीचे भोजन दिले जाते. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांना स्वत:च्या घरातून खाद्यपदार्थ किंवा जेवण मागविण्यास मनाई केलेली आहे. तसेच, रुग्णांना करोना आजारातून मुक्त करण्यासाठी आवश्यक समुपदेशन डॉक्टरांकडून केले जात आहे.
डॉक्टर व परिचारिकांची सोय….
रुग्णालयामध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका हे करोना रुग्णांच्या संपर्कात येतात. त्यामुळे ते घरी गेल्यास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना त्यामुळे संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता म्हणून डॉक्टर व परिचारिका यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे.
भोसरी येथील सीआयआरटी आणि कासारवाडीतील येथील एका खासगी हॉटेलमध्ये अशा एकूण 120 जणांची सोय केलेली आहे. त्याशिवाय, रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेत शिकणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरच राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे.