पिंपरी-चिंचवड : रस्त्यावरील 475 वाहने जप्त; लवकरच लिलाव होणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागा येथे धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथकाने ही वाहने जप्त केली. यामध्ये तब्बल 475 बेवारस वाहनांचा समावेश आहे. ही सर्व वाहने मोशी कचरा डेपोजवळील खाण परिसरात ठेवण्यात आली आहेत. त्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर, पदपथावर वाहने अनेक दिवसांपासून उभी दिसतात. या वाहनांमुळे परिसरामध्ये अस्वच्छता पसरली आहे. तसेच रस्ते अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा होत आहे. या बेवारस वाहनांमुळे रस्त्यांची स्वच्छता करता येत नव्हती. तसेच गटारे सफाई व पदपथांची दुरुस्ती करण्यातही अडचणी येत होत्या. याबाबत स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी ही वाहने हटविण्याची मागणी केली होती.

याबबाबत महापालिका, वाहतूक विभाग आणि आरटीओ यांच्या सहकार्याने समिती गठित करण्यात आली. त्यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील धूळ खात पडलेली वाहने जप्त करण्यात आली. त्यानुसार दुचाकी, तीन चाकी रिक्षा, ऑटो, मोटार, ट्रक, मिनी बस अशी तब्बल 475 वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेली वाहने मोशी कचरा डेपोजवळील खाण परिसरात ठेवण्यात आली आहेत. आरटीओतील नोंदीनुसार संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जप्त केलेल्या या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत पडलेली वाहने महापालिकेने एक मोहीम राबवून जप्त केली आहेत. वाहतूक पोलीस व आरटीओने शहरामध्ये 250 ते 300 बेवारस वाहने असल्याची आकडेवारी दिली होती. मात्र प्रत्यक्षात महापालिकेने मोहीम राबविली त्या वेळी या कारवाईत तब्बल 475 बेवारस वाहने सापडली आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ही कारवाई रात्रीच्या वेळी करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. शहरामध्ये कुठेही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, पदपथावर बेवारस वाहने असतील, तर पालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर कळवावे.
– अजित पवार, अतिरिक्त आयुक्त.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.