पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार आज पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. करोनाबाधित रुग्णांचे यापूर्वीच मृत्यू झाले असताना पूर्वीच्या 36 आणि गेल्या 24 तासांतील 4 अशा एकूण 40 मृत्यूंची नोंद एकाच दिवसात करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.
खासगी रुग्णालये महापालिकेला करोना मृत्यू सारख्या गंभीर बाबींबाबतही वेळेवर माहिती देत नसल्याचे वारंवार उघड होत आहे. महापालिका प्रशासन देखील खासगी रुग्णालयांवर कोणतीच कारवाई करत नसल्याने खासगी रुग्णालयांसोबत महापालिका प्रशासनालाही मृतांचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
यापूर्वी देखील अनेकदा महापालिकेला आकड्यांमध्ये बदल करावे लागले आहेत आणि जुन्या मृत्यूंची संख्या एकाच दिवशी एकूण मृत्यूच्या आकड्यात भर टाकावी लागली. शहरामध्ये आज नवीन 167 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर पूर्वीच्या 36 व आजच्या 4 मृतांची एकत्रित 40 मृत्यूची नोंद झाली. तसेच शहरातील एकूण रुग्णांची संख्या 93814 वर पोहचली आहे.
आजचा अहवाल
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 167 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3 व शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
तर यापूर्वी मृत्यू झालेल्या 36 रुग्णांची माहिती पालिका प्रशासनाला आज उपलब्ध झाली. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2399 इतकी झाली आहे. त्यामध्ये शहरातील 1710 तर शहराबाहेरील 689 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 281 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 90179 इतकी झाली आहे.