पिंपरी चिंचवड : शहरात 390 अनधिकृत मोबाइल टॉवर

पिंपरी – शहरामध्ये सध्या 390 अनधिकृत तर 533 असे 923 मोबाइल टॉवर आहेत. मोबाइल टॉवर न पाडण्याबाबत न्यायालयाच्या निर्देशामुळे पालिकेला कोणतीही कारवाई करता येत नाही. मात्र, हेच अनधिकृत टॉवरला निश्चित दंड करून अधिकृत करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम ठरविण्याचा अधिकार आयुक्तांना देण्यात आला आहे.
तंत्रज्ञानाचा दिवसेंदिवस वापर वाढला असतानाच पिंपरी-चिंचवड शहरात मोबाइल टॉवरची संख्याही झपाट्याने वाढली आहे. मोबाइल, इंटरनेट नेटवर्किंगचा वापर वाढला असल्याने कंपन्यांनी शहरातील विविध भागातील इमारतींवर आणि नागरी वस्तीत मोबाइल टॉवरही उभारले आहेत.
शहरात 390 अनधिकृत मोबाइल टॉवर आहे. अनधिकृत टॉवरमुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे परवानगी शुल्क व मिळकतकर बुडत आहे. हे रोखण्यासाठी अनधिकृत मोबाइल टॉवरला निश्चित दंड करून अधिकृत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
अनधिकृत टॉवरला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 तसेच, विकास नियंत्रण नियमावलीनुसार नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी तडजोड शुल्क आकारून अशा बाबी नियमित करण्यास मान्यता देण्यात येते. तसा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने 19 मे 1997 ला मंजुर केला आहे. या बाबीसाठी, शुल्कासाठी दर निश्चित केले आहेत. या दरामध्ये वेळोवेळी बदल केले. अनधिकृत मोबाईल टॉवर नियमित करण्यासाठी आयुक्तांच्या मान्यतेने तडजोड शुल्काचे दर निश्चित केले आहेत. दरात केलेल्या बदलास सर्वसाधारण सभेची मान्यता नाही. त्यामुळे हे दर निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव बांधकाम परवानगी विभागाने पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे अनधिकृत मोबाईल टॉवरला दंड करून अधिकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात 923 मोबाईल टॉवरची नोंद आहे. त्यामध्ये 533 अधिकृत, तर 390 मोबाइल टॉवर हे अनधिकृत आहेत. यापूर्वी अनधिकृत टॉवरला 1 लाखांचे प्रशमन शुल्क, 10 हजार ऍडमिस्ट्रेशन फी आणि आकारानुसार डेव्हलपमेंट शुल्क आकारून नियमित करण्यात येत होते. मात्र, आता अनधिकृत मोबाईल टॉवर नियमित करण्यासंदर्भात दर निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत.
– मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
मोबाइल टॉवरसाठी नियमावली
केंद्र सरकारने मोबाईल टॉवरबाबत न्यू राईट ऑफ वे रुल्स अधिसूचित केले असून 17 ऑगस्ट 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार, परवाना असलेल्या आणि खासगी मालमत्तेवर टेलिग्राफच्या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपनीला प्राधिकरणाच्या कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, टेलिकॉम कंपन्यांना टेलिग्राफ इन्फास्ट्रक्चर उभारणीची लेखी माहिती प्राधिकरणाला द्यावी लागते. याशिवाय इन्फास्ट्रक्चरविषयी अभियंत्याद्वारे पडताळणी केलेली प्रतही सादर करणे बंधनकारक आहे.





