- लाचखोरीच्या प्रकरणात शहरातील पोलिसांचा पहिला क्रमांक
प्रभात विशेष
पिंपरी – शासकीय कामांसाठी लाच देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून गेल्या 24 महिन्यांत 24 लाचखोर गजाआड गेले आहेत. यामध्ये तब्बल 23 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत. शनिवारी (दि. 28) म्हाळुंगे पोलीस चौकीतील उपनिरीक्षक राहूल भदाणे हे लाचखोरीच्या प्रकरणात अडकले. त्यामुळे शहरातील आणि विशेषत: पोलीस खात्यामधील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खिसे गरम केल्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. पोलिसांमध्येही गुन्हा दाखल न करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी सर्रास पैशाची मागणी केली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरांना जरब बसविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तरीही लाचखोर मंडळी आणि आणि लाच देणारे असे दोघेही हुशार झाल्याने लाच घेण्यासाठी नवनवीन मार्गाचा अवलंब करीत आहेत.
ऑगस्ट 2018 मध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आत्तापर्यंत एकूण 24 गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 23 गुन्हे हे फक्त पोलिसांवर दाखल झाले असून एक गुन्हा अपर तहसीलदार कार्यालयात लाच घेतानाचा आहे. तर 1 जानेवारी 2020 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागात लाचखोरांना पकडण्यासाठी तब्बल 101 सापळे झाल्याची नोंद आहे. गेल्या काही वर्षांत लाचखोरांना शिक्षा होण्यासाठी तसेच त्यांच्याविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लाचखोर शासकीय कर्मचारी आणि अधिकारी थेट लाच न घेता ती मध्यस्थांच्या माध्यमातून स्वीकारतात.
सापळ्यांमध्ये सापडू नये यासाठी लाचखोरांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. लाच घेतल्यानंतर शिक्षा होते, अशी जरब निर्माण केल्यामुळे लाचखोर थेट पैसे मागण्याचे टाळतात. मध्यस्थांमार्फत लाच घेण्याच्या प्रकरणांमध्येही तक्रारदार पुढे आल्यानंतर त्यांच्या तक्रारीनुसार संबंधितांवर कारवाई केली जाते.
अप्पर हवेली तहसीलदार कार्यालयातील विकी मदनसिंह परदेशी याला सात हजारांची लाच घेताना सप्टेंबर 2019 मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास ऊर्फ अनिल जाधव यांना सप्टेंबर 2019 महिन्याच्या अखेरीस एका तक्रारदाराकडून मध्यस्थामार्फत तीन लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर निगडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रवीण मुळक याला एका चायनीज हातगाडीवाल्याकडून पाच हजारांची लाच घेताना नोव्हेंबर 2011 मध्ये अटक करण्यात आली.
हिंजवडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मिलन कुरकटे हा 24 जानेवारी 2020 रोजी लाच घेण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला. त्याला 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तर सांगवी पोलीस ठाण्यातील एका महिला हवालदाराला दीड हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. 4 मार्च 2020 रोजी ही कारवाई करण्यात आली. तर 21 जून 2020 रोजी चिखली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक फारूख सोलापूरे याला पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. तर दिघी पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक निवृत्ती चव्हाण याला 10 ऑक्टोबर 2010 रोजी चार हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त
नियंत्रण आणतील काय?
कायद्यानुसार लाच देणे आणि घेणे हे दोन्हीही गुन्हे आहेत. गेल्या दोन वर्षांत लाच घेणाऱ्या 24 जणांवर कारवाई करण्यात आली असली तरी देणाऱ्या एकाही व्यक्तीवर अद्यापपर्यंत गुन्हा नोदला गेलेला नाही हे विशेष. सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांची प्रतिमा काही मुठभर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळ मलीन होत आहेत. सध्या कृष्णप्रकाश हे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या काळातील हे पहिलेच प्रकरण आहे. अवैध धंद्याविरोधात मोहिम उघडणारे कृष्णप्रकाश पोलीस खात्यामधील लाचखोरीवर नियंत्रण आणतील का? असाही मुद्दा सध्या उपस्थित झाला आहे.
वर्ष दाखल झालेले गुन्हे
2018 (15 ऑगस्टनंतर) 08
2019 10
2020 (ऑक्टोबर अखेर) 06