222 रुग्णांना “डिस्चार्ज’ : जुन्या मृत्यूची आज नोंद
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 220 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर यापूर्वी झालेल्या 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आजपर्यंत शहरामध्ये 92551 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मंगळवारी चार वाजेपर्यंत शहरातील 220 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र यापूर्वी मयत होऊन आज पालिका प्रशासनाकडे 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत शहरामध्ये 92551 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2309 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शहराबाहेरील 671 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 222 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 88579 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2817 संशयित रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. 697 संशयितांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
खासगी रुग्णालयांकडून वेळेत माहिती नाहीच
गेल्या आठ महिन्यांपासून महापालिका प्रशासनाला खासगी रुग्णालयांमधून मृत्यूची आकडेवारी वेळेत मिळत नाही. दरम्यानच्या काळात प्रशासनाने ज्या रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यांना पत्र देऊन मृत्यूची माहिती एक दिवसामध्ये कळविण्याचे आदेश दिले होते. मात्र वैद्यकिय विभागाच्या या पत्रव्यवहाराला खासगी रुग्णालयांनी केराची टोपली दाखवली आहे. अद्यापही खासगी रुग्णालयांकडून वेळेत रुग्णसंख्या व मृत्यूची आकडेवारी पालिकेला उपलब्ध होत नाही. त्यावर पालिका प्रशासनानेही बघ्याची भूमिका घेतली असल्याने खासगी रुग्णालयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आज अचानक 9 मृतांची नोंद पालिका प्रशासनाने केली आहे.