देशी पिस्तूल कमरेला लावून फिरणारा गजाआड

पिंपरी – गर्दीत राजरोसपणे देशी बनावटीचे पिस्तूल कमरेला अडकावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूलसह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी केली.

दत्ता एकनाथ लोणकर (वय 35, रा. लांडेवाडी, विठ्ठलनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आळंदीतील पालखी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडुनये म्हणून गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक पालखी मार्गावर बंदोबस्तास होते. भोसरी येथील लांडेवाडी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोलिसांना पाहून एका इसम पळून जाताना दिसला.

पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. गर्दीत राजरोसपणे हा सराईत कमरेला पिस्तूल लावून हिंडत होता. पोलिसांनी त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. पोलिसांनी त्याला अटक केले. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लांडगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)