मावळ लोकसभा : उमेदवारांचा दुसऱ्या टप्प्यातील खर्च सादर

“त्यांच्या’कडे राहणार विशेष लक्ष ः पहिल्या टप्प्यात खर्चात आढळली होती तफावत

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी दि. 19 एप्रिल पर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाचा लेखा-जोखा आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला. उमेदवारांनी दुसऱ्या टप्प्यातील खर्च सादर करताना त्यांना पहिल्या टप्प्यातील खर्चाच्या त्रुटी दुरुस्त करुन सादर करायच्या असल्याने या हिशोबाकडे निवडणूक विभागाचे लक्ष आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत होत आहे. या निवडणुकीत तब्बल 24 उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात उतरले असल्याने या उमेदवारांवर “लक्ष’ ठेवण्यासाठी निवडणूक आयोगालाही कसरत करावी लागत आहे. निवडणुकीत उतरलेल्या उमदेवारांकडून केला जाणारा खर्च, तसेच आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये, म्हणून निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मावळ मतदारसंघात उमेदवांरानी केलेल्या खर्चाची पहिल्या टप्प्यातील तपासणी दि. 15 एप्रिल रोजी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये अर्ज माघार घेतलेल्या चार व निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या चार अशा आठ जणांनी निवडणुकीचा खर्च सादर केलेला नव्हता. त्यामुळे या उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस काढली होती.

तसेच पहिल्या टप्प्यात खर्च सादर करताना काही उमेदवारांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आली होती. निवडणूक आयोगाने मांडलेला खर्च व उमेदवारांनी सादर केलेला खर्च यामध्ये त्रुटी आढळून आल्याने या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील खर्च सादर करताना योग्य पध्दतीने करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यामुळे आज दि. 20 एप्रिल रोजी उमेदवारी खर्च सादर करताना हे उमेदवार आपला खर्च कशा पद्धतीने सादर करतात याकडे लक्ष लागले होते.

आज दि.20 एप्रिल रोजी प्राधिकरणाच्या इमारतीमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये उमेदवारांनी आपला दुसऱ्या टप्प्यातील खर्च सादर केला आहे. उमेदवारांकडे असलेल्या खर्चाची नोंदवही, रजिस्टर निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यत निवडणूक आयोगाचे अधिकारी व कर्मचारी उमेदवारांच्या खर्चाचे ताळेबंदपत्रक जुळवत होते. त्यामुळे, कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.

खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई

पहिल्या टप्प्यात एकूण 8 जणांनी आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगापुढे सादर केलेला नव्हता. त्यामुळे, या उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस काढून दुसऱ्या टप्प्यापर्यंत आपला खर्च सादर करावा असे आदेश दिले होते. मात्र, आज दुसऱ्या टप्प्यातही काही उमेदवारांनी खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे या उमेदवारांवर आता काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)