गवळी उद्यानात कंपन्यांनी केले अतिक्रमण

टवाळखोरांचा वावर : सीमाभिंत पाडून आवाराला बनवले “ओपन गोडाऊन’

पिंपरी – भोसरी-आळंदी रस्त्यावरील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानाची दूरवस्था झाली आहे. या उद्यानाची सीमाभिंत नावापुरती उरली असून, हे उद्यान टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. एवढेच नव्हे तर उद्यानालगतच्या कंपन्यांकडून या उद्यानाची सीमाभिंत तोडून, उद्यानाच्या आवारास आपले “ओपन गोडाऊन’ बनवले आहे. या आवाराचा उपयोग टॅंक, बॉयलर यांसारख्या वस्तू ठेवण्याबरोबरच चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी केला जात आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाला अवकळा आली आहे.

भोसरी-आळंदी रस्त्यावर भोसरीकडून मॅग्झिन चौकाकडे जाताना दोन्ही बाजूची जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. मात्र, उजव्याकडील बाजूचा ताबा सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांनी अनधिकृतपणे घेतला आहे. तर डाव्या बाजूला असलेल्या बालोद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानाच्या सीमभींतीची उंची वाढविण्यासाठी चार फुटांची भिंत बांधून, त्यावर केलेल्या तारेच्या कंपाऊंडच्या तारा चोरीला गेल्या आहेत. काही एकरांमध्ये पसरलेल्या या उद्यानाला दोन फुटांपेक्षा अधिक उंचीची सीमाभिंत नाही. याचा फायदा घेत, समाजकंटकांचा या उद्यानात कायम वावर असतो. उद्यानात ठिकठिकाणी आढळणाऱ्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या याठिकाणी ओल्या पार्ट्या झाल्याची साक्ष देतात.

“या ठिकाणी गायरान जागा असून, काही समाजकंटकांकडून मोडतोड झालेली आहे. याची पाहणी करून, लवकरच या उद्यानाचा विकास केला जाईल.
– नितीन काळजे, माजी महापौर व स्थानिक नगरसेवक

या उद्यानालगत असलेल्या कंपन्यांकडून उद्यानाची संरक्षक भिंत तोडण्यात आली असून, उत्पादित केलेल्या वस्तू उद्यानाच्या आवारात बिनदिक्कतपणे ठेवल्या जात आहेत. काही दूध उत्पादक या उद्यानाचा वापर आपली जनावरे चारण्यासाठी करतात. या उद्यानातील झाडांना पाणी दिले जात नसल्याने, झाडे पाण्याअभावी जळून चालली आहेत. उद्यानात बांधलेले एकमेव जॉगिंग ट्रॅक फक्‍त नावालाच राहिले आहे. विद्युत विभागाकडून या उद्यानाचा वापर वीजेचे खांब इतर वस्तू ठेवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे या उद्यानाला अवकळा आली आहे.

“ते उद्यान नसून, गायरान होते. ती जागा विकसित करण्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून निविदा काढण्यात आली आहे. या जागेवर उद्यान विभागाकडून वृक्ष लागवड केली असून, उद्यान विकसित करण्याचे विचाराधीन आहे. याठिकाणी असलेल्या अनधिकृत साहित्यावर लवकरच जप्तीची कारवाई केली जाईल.
– सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधीक्षक, पिंपरी-चिंचवड मनपा

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.