पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट आणि मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी बेमुदत साखळी आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांच्या पालिका प्रशासनाकडे असलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कोविड सेंटर खासगी संस्थांना न देता महापालिकेने स्वत: चालवावीत. आर्थिक गैरव्यवहारात सामील असणारे वैद्यकीय विभागाचे मुख्य अधिकारी अनिल रॉय व सहभागी अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करावे.
वैद्यकीय विभागात खासगी तत्वावर कामावर असणाऱ्या सर्व कामगारांना त्यांचे टाळेबंदीच्या काळातील मार्च ते मे या तिन्ही महिन्यांचे पूर्ण मानधन देण्यात यावे व या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा 50 लाखाचा विमा काढण्यात यावा, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत पालिकेच्या वतीने मानधनावर घेण्यात आलेल्या सर्व सेविकांना कायम करावे, माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅबचे वाटप करण्यात यावे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोविड समर्पित रुग्णालयाच्या धर्तीवर स्थानिकांना इतर आजारांवर मोफत, रास्त व दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी तात्काळ डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाबरोबर करार करण्यात यावा, यशवंतराव स्मृती रुग्णालयातील अपुरा ऑक्सिजन व ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे रुग्णालयात 8 ते 10 रुग्णांचे झालेले मृत्यू या संदर्भात दोषी असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी यांचे निलंबन करून कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.