पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणांचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता

पिंपरी – नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यांनी पथारी व हातगाडीचालकांची अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. अन्यथा पिंपरी कॅम्प बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेत, या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर ठेवलेल्या व विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना कॅम्पातून चालणे देखील मुश्‍किल झाल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्पातील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शहरातील पिंपरी कॅम्प ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स व कापडासाठी ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे शहर, मावळ तालुका व परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी विविध वस्तू खरेदीसाठी येत असतात. मात्र, या बाजारपेठेत पथारी व हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढत असून, त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली कॅम्पातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्‍त हर्डीकर यांची भेट घेतली आहे. या व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा पिंपरी कॅम्प बंद ठेवण्याचा इशारा या बैठकीत दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी या कारवाईला विरोध केला आहे. या पथारी चालकांमुळे या व्यापाऱ्यांना अथवा वाहतुकीला कोणताही अडथळा होत नसल्याचा दावा केला आहे. याउलट कॅम्पातील व्यापाऱ्यांनी दुकानांचे बांधकाम वाढविले असून, या दुकानांसमोरच चप्पल, बॅग व अन्य विक्रेत्यांना जागा भाड्याने दिली आहे. या विक्रेत्यांकडून दरमहा हजारो रुपये भाडे अनधिकृतपणे वसूल केले जात आहे. याशिवाय कॅम्पातील अरुंद रस्त्यावर स्थानिक व्यापाऱ्यांच्या शेकडो दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने, रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यामुळे दुचाकी वाहने व या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे पथारी चालकांवरील कारवाई चुकीची असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

अतिक्रमणाचा चेंडू आयुक्‍तांच्या कोर्टात

दोन्ही विक्रेत्यांचे नेतृत्व करणाऱ्या गटाच्या नेत्यांनी आयुक्‍त हर्डीकर यांची शिष्टमंडळासह स्वतंत्रपणे भेट घेत, आपली बाजू कशी बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पथारी व हातगाडी चालकांकडे अधिकृत परवाने असताना महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीने केला आहे. स्थानिक आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांना देखील या प्रश्‍नी लक्ष घालण्याची विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

कॅम्पात वाहतूक नियमांची “ऐशी की तैशी’

सकाळी दहा रात्री नऊ या वेळेत पिंपरी कॅम्पात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दुकानांमधील माल उतरविण्यासाठी येणाऱ्या ट्रक, टेम्पो या वाहनांचा यात समावेश आहे. मात्र, ही बंदी झुगारून भरदिवसा कॅम्पातील अनेक दुकानांमध्ये ट्रक व टेम्पोमधील माल उतरविला जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)