मेट्रोच्या कामामुळे अजूनही अतिजलद बससेवेचा वेग मंदावलेलाच
पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटीएस मार्ग हा अडथळ्यांची शर्यत बनला आहे. या मार्गावर सुरू असलेल्या अतिजलद बस सेवेचा वेग मंदावला आहे. पिंपरी ते दापोडी या अंतरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बीआरटीएस मार्ग ठराविक अंतरावर बंद केले आहेत. तर, पिंपरी ते निगडी या अंतरात चौकांजवळ बीआरटीएस चुकीच्या पद्धतीने निर्माण करण्यात आल्याने अतिजलद बससेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी या अंतरात बीआरटीएस बस सेवा सुरू आहे. या मार्गावरील बस सेवेत विविध अडथळे येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पिंपरी ते नाशिक फाटा या अंतरात बीआरटीएस बस वाहतूक काही अंशी सुरळीत आहे. नाशिक फाट्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत बीआरटीएस मार्गावर बॅरीकेट्स लावलेले नाहीत. या मार्गावरून पुढे गेल्यानंतर कासारवाडीपासून ऍटलस कॉप्कोपर्यंत बीआरटीएस मार्ग बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर काही अंतर बीआरटीएस मार्ग सुरू आहे. तर, फुगेवाडीला पुन्हा बीआरटीएस मार्ग बंद करण्यात आला आहे. दापोडीपर्यंत हा मार्ग बंद केलेला आहे.
दापोडीवरून परतीच्या प्रवासात कासारवाडीजवळ अल्फा लाव्हल कंपनीसमोर बीआरटीएस मार्ग बंद केलेला आहे. तेथुन पुढे कासारवाडीपासून नाशिक फाट्यापर्यंत बीआरटीएस मार्गच नाही. त्यामुळे कासारवाडी आणि नाशिक फाटा येथे बीआरटीएस बसथांबे नावालाच राहिले आहेत. नाशिक फाटा बसथांब्यासमोर तर वाळूचे ढिगारे पडलेले आहे. तेथुन पुढे गेल्यावर पिंपरीपर्यंत सुरळीत बीआरटीएस वाहतूक सुरू आहे.
पिंपरी ते दापोडी या अंतरातील बीआरटीएस मार्गादरम्यान ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो थांबे उभारणीच्या कामामुळे आवश्यक बांधकाम साहित्य या मार्गात ठिकठिकाणी पडलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी बीआरटीएस मार्ग बंद करावे लागले आहेत. पीएमपी बस व्यतिरिक्त अन्य वाहनांनी बीआरटीएस कॉरीडॉरमधून प्रवास करू नये, यासाठी वारंवार पोलिसांमार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापुढील काळात बुम बॅरिअर बसवून त्यासाठी प्रतिबंध करण्याचे नियोजन आहे.
– श्रीकांत सवणे, सह-शहर अभियंता, बीआरटीएस.