लोणावळा : ‘चार ते पाच वेळा भूमिपूजन झालेला लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल हा ऐतिहासिक उड्डाणपूल बनला आहे. लोणावळा शहरातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय असताना तो सोडविताना मागील दहा वर्षातील सत्ताधारी यांना पूर्णतः अपयश आले. कामाचे कोणतेही नियोजन न करता केवळ श्रेय घेण्याच्या प्रवृत्तीमुळे हा पूल रखडला आहे. मात्र येत्या महिनाभरामध्ये या कामाला पूर्ण गतीने सुरुवात केली जाईल,’ असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
लोणावळा शहरात जनसंवाद दौऱ्यानिमित्त आले असता आमदार शेळके यांनी भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना शेळके बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, पुलाच्या दोन्ही बाजूला जागेचे भूसंपादन न झाल्याने काम रखडले आहे. भूमिपूजन करताना या महत्त्वाच्या बाबीकडे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळे आज नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. ठेकेदार देखील यामुळे त्रस्त झाला आहे, असे सांगत पुलाच्या कामावरून प्रशासनाची कान उघडणी केली.
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या विषयासंदर्भात मीटिंग होऊन भूसंपादन कामासाठी १५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर मागील पाच महिन्यांमध्ये प्रशासनाने या कामात काय प्रगती केली याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींकडून नागरिकांची दिशाभूल
लोणावळा शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने २००५ साली नांगरगाव-भांगरवाडी दरम्यान रेल्वे उड्डाणपुल उभारणीचा ठराव केला. प्रत्यक्ष काम ऑगस्ट २०१९ रोजी सुरु केले. त्यापूर्वी तीन ते चार वेळा याच कामाचे भूमिपूजन झाले. सुरुवातीला गतीने सुरू झालेले हे काम नंतर मात्र तब्बल चार वर्ष बंद पडले. स्थानिक नेते मंडळी, लोकप्रतिनिधी लवकर काम होईल म्हणून लोकांची खोटी समजूत काढत राहिले आहे. मागील दहा वर्ष लोणावळा नगरपरिषदेत भाजपाची सत्ता होती व आमदार, खासदार महायुतीचे होते, तरी देखील कामाला गती का मिळाली नाही, हा मोठा गहन प्रश्न आहे.