लोणावळा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्ष संघटनेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसेच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
लोणावळा शहर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात गेली अनेक वर्षे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे बाळासाहेब लक्ष्मण फाटक यांची पुणे जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पक्षाच्या लोणावळा शहर प्रमुख पदी खंडाळा विभागातील परेश परशुराम बडेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात बाळासाहेब फाटक यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे जिल्हा संघटक पदासोबत चिंचवड व मावळ भागाची जबाबदारी दिली आहे. तर, लोणावळा शहरप्रमुख म्हणून जबाबदारी मिळालेले परेश बडेकर हे अनेक वर्षे शिवसैनिक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी यापूर्वी खंडाळा विभाग संघटक पदाची जबाबदारी सांभाळली आहे, तसेच हिंदुस्तान माथाडी कामगार व जनरल सेनेचे ते तालुका अध्यक्ष देखील होते.
नियुक्ती नंतर बोलताना फाटक आणि बडेकर या दोघांनीही आपण सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले. निवड जाहीर झाल्यानंतर संपूर्ण लोणावळा शहरातून दोघांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.