पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ६३ वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनमालक, चालक व वित्तदात्यांनी ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहनांचा कर व दंड त्वरित भरून वाहने सोडवून घेऊन जावे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत वाहने जप्त केली आहेत. यातील काही वाहनांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, तर काही वाहनमालकांनी कर व दंड न भरल्यामुळे अनेक वर्षापासून ही वाहने आरटीओ कार्यालयात पडून आहेत.
यातील ६३ वाहनमालकांनी वाहने सोडवून नेण्यासाठी आरटीओशी संपर्क केला नाही. गुरुवारपासून (दि. १६) पुढील ३० दिवसांत वाहनांचा कर व दंड भरून वाहने सोडवून घेऊन जावीत. अन्यथा त्या वाहनांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय आरटीओ प्रशासनाने घेतला आहे.
ई- लिलावाची तारीख, वाहनांचा यादी, वेळ व ठिकाणी www.eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले आहे.