पिंपरी – भोसरीतील कुस्ती संकुलाच्या उद्घाटनास रविवारी (दि. 6) आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाच्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. “फडणवीस गो बॅक-अंकुशभाऊ अमर रहे’ म्हणत सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलकांच्या पवित्र्यामुळे फडणवीस यांना आपला मार्ग बदलावा लागला.
भोसरीतील पै. मारूतीराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे उद्घाटन रविवारी (दि. 6) सायंकाळी सहाच्या सुमारास झाले. यावेळी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी परिसरात गर्दी करीत उद्घाटनास तीव्र विरोध केला. भाजपचे माजी मंडल अध्यक्ष संतोष लांडगे, बाळाभाऊ लांडगे, अब्दुल अहमद, मारूतीभाऊ लांडगे, पुखराज जांगीर, संजय उदावंत, शेखर गव्हाणे यांच्यासह सुमारे चारशे कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना संतोष लांडगे म्हणाले, मुंडेसाहेब, अटलजी यांची भाजप आता राहिलेली नाही. सध्याची भाजपा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना भोसरीमध्ये येण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे फडणवीस यांना विरोध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो.
“फडणवीस गो बॅक-अंकुशभाऊ अमर रहे’ या घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या. मात्र, आंदोलनामुळे फडणवीस यांचा रस्ता बदलण्यात आला. आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललो असता पोलिसांनी आम्हाला अडविले. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. आमच्या हातातील फलक आणि काळे झेंडे हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यास विरोध केला. फडणवीस आम्हा निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेट घेतील आणि आमच्या भावना जाणून घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्यावर मार्गच बदलण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले.