देहूगाव : देहू नगरपंचायतीच्या दोन नामनिर्देशित सदस्यांनी पदाचा राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी (दि.25) नगरपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रियेमध्ये दोन अर्जापैकी एक अर्ज अवैध ठरल्याने वैध ठरलेल्या अमित टिळेकर यांची नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक पिठासीन अधिकारी यशवंत माने यांनी घोषित केले.
एक अर्ज अवैध ठरल्याने दोन नामनिर्देशन सदस्य पदातील एक पद रिक्त राहिले आहे.
नामनिर्देशित रिक्त पदांसाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया झाली. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी कामकाज पाहिले. यावेळि नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
नगरपंचायत कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी घार्गे यांच्याकडे अमित टिळेकर आणि योगेश मोरे या दोघांचे नामनिर्देशित अर्ज सादर झाले होते. पिठासीन अधिकारी माने यांनी दोन्ही अर्जाची छाननी केली असता सार्वजनिक न्यासचे पाच वर्षांचा अनुभवाचे कार्यकाल पूर्ण नसल्याने मोरे यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे एकमेव वैध असलेले टिळेकर यांची नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी माने यांनी घोषित केले.
नामनिर्देशन सदस्य साठी इच्छुक असणार्या आणखी दोघा इच्छुक उमेदवाराचा अर्जच सादर न झाल्याने इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक संतप्त झाले होते. त्यामुळे नगरपंचायत परिसरामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळेे पोलिसांना बोलवावे लागले होते. नगरसेवकांच्या वतीने गटनेत्याने झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. मात्र निवडणूक प्रक्रिया रद्द करता येत नसल्याने याबाबत असलेले योग्य निर्णय जिल्हाधिकारी ठरवतील, असे उपविभागीय अधिकारी माने यांनी यावेळी सांगितले.