पिंपरी : जागतिक हवामानदिन साजरा केला जात असताना, उद्योगनगरीच्या हवामानाचे ताळतंत्र बिघडलेलेच होते. महापालिका करीत असलेल्या उपाययोजना, यंदा मांडलेले हवामान अंदाजपत्रक व राज्याच्या अधिवेशनात शहरातील हवेच्या गुणवत्तेबद्दल चर्चा होऊनदेखील हवामान दिनाच्या पूर्वसंध्येला शहराचे हवामान आरोग्य ढासळलेल्या अवस्थेतच दिसून आले. महापालिका प्रशासनाच्या उपाययोजना केवळ कागदोपत्रीच दिसत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने आपले हवामान अंदाजपत्रक फ्रेमवर्क केले आहे. त्यानुसार असा दृष्टीकोन स्वीकारणारे जागतिक स्थरावर हे पाचवे शहर असणार आहे. परिणामी पिंपरी चिंचवड हे ओस्लो, लंडन, न्यूयॉर्क आणि मुंबई या जागतिक शहरांच्या पंगतीत बसणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र त्या तुलनेत उपाययोजान होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.
शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार्या वृक्षांची गणना झाल्याचा पर्यावरण विभागाचा दावा ग्रीन आर्मी या पर्यावरण संघटनेने फोल ठरविला आहे. तर दिघी आणि निगडीवगळता अन्यठिकाणी नव्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणानंतर त्याची देखभाल करण्यासारखे प्रयत्न होत नसल्याने शहराची हवा दिवसेंदिवस खराब या प्रकारात मोडत असल्याचे वास्तव आहे.
काही दिवसांपूर्वी वाकड परिसरातील सोसायटीधारकांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला आणि हवा प्रदूषणाबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. वातावरणातील सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. परिसरातील लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये दम्याचे, लर्जीचे आणि श्वसनासंबंधी आजारांचे प्रमाण वाढत आहे.
यासह नैसर्गिक जीवनमानावर परिणाम: सिमेंटच्या धुळीचा थर रस्त्यांवर, गाड्यांवर आणि घरांवर साचत असून, नागरिकांचे जीवनमान ढासळत आहे, ही बाब गंभीर आहे. ही बाब लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात मांडून, याबाबत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन सादर केले होते. दरम्यान, वाकड परिसरात हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्या दोन आरएमसी प्लँट चालकांना नोटीस बजावत त्यावर कारवाई करण्यात आलि आहे.
काही दिवसांपुर्वी महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत मिथेन वायू मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होत असल्याची बाब अंतराळात संशोधन करणार्या इस्त्रो या संस्थेने नोंदविली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रन मंडळाने नोटीस बजावली होती. तर दोन महिन्यांपुवि चिखली, कुदळवाडीतील भंगार गोदामांना लागलेली आग आठवडाभर धुमसत होती. त्यामधून मोठ्या प्रमानावर विचारी वायू आकाशात आठवडाभर झेपावत होता. त्याचा शहराच्या हवामान दर्जावर झाला होता. महापालिकेच्या वतीने महत्वाच्या चौकात उभारलेली वायू यंत्र व केल्या जाणार्या फवारणीचा फारसा प्रभावी उपयोग झाला नसल्याचे हवेच्या गुणवत्तेवरून दिसून येत आहे.
हवामानदिनाच्या पुर्वसंध्येला नोंदविलेली हवेची गुणवत्ता
निगडी – 196
भूमकर चौक- 128
भोसरी- 101
वाकड- 126