- पालिका रुग्णालयात 588 बेड रिकामे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामधील करोनाबाधित रुग्णसंख्या वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड शिल्लक असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये 900 बेड असून त्यापैकी 588 बेड शिल्लक आहेत.
महापालिकेच्या वतीने चार रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. त्यामध्ये ऑटो क्लस्टर, वायसीएम, जिजामाता व बालनगरी येथील कोविड सेंटरचा समावेश आहे. तसेच भोसरी रुग्णालयामध्येही उपचार करण्यात येत आहे. मात्र याठिकाणी अद्याप रुग्ण दाखल केले नाहीत. ऑटो क्लस्टर रुग्णालयामध्ये 200 बेडची व्यवस्था आहे.
सद्यस्थितीत या रुग्णालयात 145 रुग्ण उपचार घेत आहेत. तर वायसीएम रुग्णालयात 100 बेड असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 70 आहे. जिजामाता रुग्णालयाची 100 बेडची क्षमता असून त्यामध्ये 20, तर बालनगरी कोविड सेंटरची 400 रुग्णांची क्षमता असून 77 रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे भोसरी रुग्णालयामध्ये 100 बेडची संख्या आहे. त्याठिकाणी सध्या एकही रुग्ण उपचार घेत नाही.
सद्यस्थितीत पालिकेच्या रुग्णालयामध्ये 312 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तर 588 बेड शिल्लक आहे. रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास भोसरी रुग्णालयात देखील उपचारास सुरूवात केली जाणार आहे. बाधित येणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढले तरी बेडची संख्या अपुरी पडणार नसल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.