नाणे मावळ : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना डोंगर टेकड्यांवरील गवत सुकू लागले आहे. अनेकदा अतिउन्हाने निसर्गनिर्मित वणवा लागून डोंगरच्या डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात. परंतु प्रत्येक वणवा हा निसर्गनिर्मित असतोच असे नाही, काहीवेळा मानवी चुकीमुळे किंवा जाणूनबुजून वणवा लावलो जातो. अशावेळी वनसंपदेचा ऱ्हास होतो. यापार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाले असून वणवा लावणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वनक्षेत्रामध्ये वणवा लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मावळ तालुका हा डोंगर टेकड्यांचा, वनांनी वेढलेला प्रदेश आहे. मावळात मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र असून गायरान, चराई क्षेत्र, राखीव क्षेत्र मोठ्या प्रामणात आहेत. सदर वनक्षेत्रात वणवा लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या असून सातत्याने यात वाढ होत आहे. काही ठिकाणी टवाळखोर मुद्दाम आगी लावीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, यापार्श्वभूमीवर जाणूनबुजून वनसंपदेचा ऱ्हास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
मावळ तालुक्यात वडगाव आणि शिरोता अशी दोन वनपरिक्षेत्रे आहेत. दोन्ही परिक्षेत्रात २१ हजार हेक्टरमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. मावळ तालुक्यातून पुणे-मुंबई महामार्ग, तसेच पुणे-द्रुतगती मार्ग जातात. या रस्त्यांवरून प्रवास करणारे काही प्रवासी विडी-सिगारेट रस्त्याच्या बाजूला टाकतात, त्यामुळेही आगी लागतात.
वनपरिक्षेत्रात आग लावणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा, तसेच दंड देखील होऊ शकतो. वनपरिक्षेत्रात वन विभागाने गस्त वाढवली आहे. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व प्रवाशांनी, तसेच पर्यटकांनी सिगारेट किंवा इतर ज्वलनशील पदार्थ, वस्तू वनपरिक्षेत्रात टाकू नयेत, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ यांनी केले आहे.
एका वणव्यात अगणित वनसंपदेचा ऱ्हास
वणव्यात लहान सहान असंख्य वन्यजीव होरपळतात, तर निसर्गप्रेमींनी लावलेली रोपे खाक होतात. उन्हाळ्यात गवत वाळलेले असते, अशा वेळी एक ठिणगी पडली तरी आग लागून मोठ्या प्रमाणावर पसरते. वनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अशा घटनांना त्वरित आळा घालणे शक्य होत नाही. मागील दोन महिन्यात मावळात वनपरिक्षेत्रात आगीच्या जवळपास सहा – सात घटना घडल्या आहेत, यातील काही घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला आग लागण्याच्या आहेत. यापार्श्वभूमीवर वन विभाग आता सतर्क झाला आहे.