Pimpri : हिंजवडीत बगाड मिरवणुकीला लोटला अथांग जनसागर

हिंजवडी : हिंजवडी वाकडकरासंह जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्ताने हिंजवडीतून निघालेल्या बगाड मिरवणुकीला सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांचा अथांग जनसागर लोटला.
हिंजवडी पासूनच वाकडच्या मंदिरात पोहचेपर्यत जागोजागी चौका चौकात बगाड रथावर व मिरवणुकीवर क्रेनमधून केलेली पुष्पवृष्टी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. रूढी परंपरेनुसार जांभूळकर घराण्यातील सोमनाथ सखाराम जांभुळकर या तरुणाला यंदाचा गळकरी होण्याचा मान मिळाला. तर गणेश संतोष (दादा) साखरे व सूरज दत्तात्रय साखरे यांना खांदेकऱ्याचा बहुमान मिळाला. हुलावळे परिवारातील विजय हुलावळे यांना काठीचा मान मिळाला.
यावेळी चांगभलं बोला चांगभलं… म्हातोबाच्या नावानं चांगभलं… पैस..पैसच्या जयघोषाने अवघी आयटीपंढरी दुमदुमली होती. खोबर भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी म्हातोबाच्या नावाचा जयजयकार केला. यावेळी गळकऱ्याला बागडावर बसवून गोलाकार रिंगण घेतले. त्यानंतर मिरवणूक वाकडच्या दिशेने मार्गस्थ झाली.
मिरवणुकीपूर्वी सायंकाळी पाच वाजता साखरे पाटील घराण्यातील किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्याच्या निवडीची घोषणा केली. त्यानंतर मारुतीरायचे दर्शन घेऊन वाजत्र्यांच्या सनई चौघाड्याच्या निनादात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात आणण्यात आले. यावेळी त्यास मळवट भरण्यास व स्नान घालण्यास जमलेल्या महिलांनी एकच गर्दी केली. गळकऱ्याची विधीवत पूजा केल्यानंतर जमलेल्या गावकऱ्यांना हळदी कुंकवाचे लेपण लावण्यात आले.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गळऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात अभ्यंग स्नान घालून वाजत गाजत होळी पायथ्याजवळ आणण्यात आले. होळी पायथ्याला आणल्यानंतर संदीप साखरे, राहुल साखरे व सुतार समाजातील पांडुरंग सुतार यांनी गळकऱ्याला गळ टोचला.
यावेळी हातातील काठी उंचावून होणारा काठी नाद तसेच जयघोषाने अवघी आयटीनगरी दुमदुमली होती. गळकरी व खांदेकऱ्यांचे पाय धुण्यासाठी व त्यांना पाणी पाजण्यासाठी पाण्याच्या घागरी घेऊन महिला गर्दीतुन वाट काढत होत्या. बगाड रिंगण मैदानात गळकरी सोमनाथला आणल्यानंतर बगडावर बसवून हजारो भाविकांच्या साक्षीने गोल रिंगण घातले. हा दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून वीस ते पंचवीस हजार भाविकांनी गर्दी केली होती.
खिल्लारी बैलजोड्या जुंपण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चुरस
हिंजवडी वाकडमध्ये शहरीकरण झाले असले तरी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आवड म्हणून घरी खिल्लारी बैल पाळले आहेत. यातील काहीजण बैलगाडा शर्यतीत तर काहीजण पंढरपूरच्या पायी वारीतील रथाला आपल्या बैलजोड्या जुंपतात. सजवलेल्या बैलजोड्या या बगाड मिरवणूक रथाला जोडण्यासाठी जीवन जांभुळकर, धोंडिबा जांभुळकर, बाळासाहेब बेंद्रे, मल्हारी साखरे, उमेश साखरे, गौरव गणेश साखरे, चेतन साखरे, अरुण साखरे, राजेंद्र जांभूळकर, मनोज साखरे, नवनाथ वसंत बोडके, तानाजी साखरे, आण्णा साखरे, गिरीष शेडगे यांच्यासह अनेकांच्या बैलजोड्या मिरवणूक रथापुढे जुंपण्यासाठी एकमेकांमध्ये चढाओढ लागली होती.
मिरवणुकीवर यंदा जेसीबी व क्रेनने पुष्पवृष्टी
यंदाच्या बगाड मिरवणुकीवर जेसीबी क्रेनमधून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. तर रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करून सप्तरंगाची उधळण करण्यात आली. हा नेत्रदीपक सोहळा यंदाच्या मिरवणूकीचे खास आकर्षण ठरला.





