पिंपरी – दारुड्या मुलाने वडिलांच्या डोक्यात पाण्याचा भरलेला हंडा घालून खून केला. ही घटना रविवारी (दि. १) रात्री वेताळनगर, चिंचवड येथे घडली.
तानाजी सदबा सोलंकर (वय ५५, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, संजय तानाजी सोलंकर (वय ३०) असे संशयित मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रविवारी सायंकाळी दारु पिऊन घरी आला. त्यावेळी मयत तानाजी आणि संजय यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून संजय याने पाण्याने भरलेला हंडा तानाजी यांच्या डोक्यात घातला.
शेजाऱ्यांनी तानाजी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.