- शहरात अवैध धंदे जोमात; सामाजिक सुरक्षा विभागाकडून धाडसत्र सुरूच
- आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांची पोल-खोल
पिंपरी – पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, असे आदेश पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले. मात्र तरीही शहरात अवैध धंदे जोमात असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या 17 दिवसांत नऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ठिकाणी छापे मारत पोलखोल केली.
अवैध धंद्यांमुळे शहरातील गुन्हेगारीमध्ये वाढ होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले. मात्र त्यांनी आदेश दिल्यानंतरही शहरातील अवैध धंदे जोमात असल्याचे दिसून येत आहे. या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आणि प्रसाद गोकुळे यांच्या नेतृत्वाखाली एक सामाजिक सुरक्षा पथक कार्यान्वित केले. या पथकाने गेल्या 17 दिवसांमध्ये नऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ठिकाणी अवैध धंद्यांवर छापा टाकला. या छाप्यांमध्ये एकूण 155 आरोपींवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली.
आत्तापर्यंत चार लाख 75 हजार 406 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या एका पथकाची कामगिरी पाहून पोलीस निरीक्षक प्रसाद गोळुळे यांना आणखी कर्मचारी देऊन दुसरेही पथक कार्यान्वित केले.
पिंपरी चिंचवड शहरात यापूर्वी खुलेआम अवैध धंदे सुरू होते. त्यातून जवळपास चार ते पाच कोटी रुपयांची वर कमाई पोलीस खात्यातील फक्त एका पथकाच्या निरीक्षकाला मिळत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
पोलीस आयुक्ताच्या आदेशानंतरही शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. या अवैध धंद्यांबाबत जर सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळते तर मग स्थानिक पोलिसांना का माहिती मिळत नाही किंवा ते कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आले आहेत त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या विरोधात आयुक्त कृष्ण प्रकाश काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.