पिंपरी : दिवसभरात 30 जणांचा मृत्यू

  • पुन्हा नव्याने 2 हजार 534 करोना बाधित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. त्यातच आता मृत्यूचा आकडाही वाढू लागल्याने करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा तब्बल 2 हजार 534 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 67 हजार 776 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 2 हजार 409 जणांना करोनाची लागण झाली असून, शहराबाहेरील 125 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. गेल्या 24 तासांत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील 19 जण शहरातील रहिवाशी होते. तर शहराबाहेरील 11 जणांचा उपचार सुरू असताना 24 तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 2 हजार 177 वर पोहोचला. शहराबाहेरील 885 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 3 हजार 62 ची संख्या आज गाठली.

गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील निगडी, बोपखेल, वाकड, भोसरी, चिंचवड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, थेरगाव, चिखली, चऱ्होली, सांगवी, पिंपरी येथील 19 रहिवाशांचा समावेश आहे. याशिवाय महापालिका हद्दीबाहेरील मुळशी, बाणेर, धायरी, खेड, मुंडवा, खडकी, आळंदी, शिवाजीनगर, बिबबेवाडी येथील रहिवाशी असलेल्या 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत शहरातील 1 लाख 40 हजार 25 जण करोनामुक्‍त झाले असून, शहराबाहेरील 9 हजार 463 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 2 हजार 101 जणांना “डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 3 हजार 181 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 11 हजार 455 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.