62 व्हेंटिलेटरवर; गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
पिंपरी – गेल्या चार महिन्यांमध्ये शहरातील साडे तीनशेहून अधिक रुग्णांना करोनामुळे प्राण गमावावे लागले. बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांहूनही कमी असले तरी सध्या शहरात अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार 110 रुग्ण अत्यवस्थ होते तर 62 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आहे.
मृत्यूची टक्केवारी कमी असली तरी जुलै महिन्यातील मृत्यूची आकडेवारी खूपच भीषण आहे. एक जुलै रोजी एकूण मृत्यूची संख्या 77 (शहरातील व बाहेरील) इतकी होती. तर महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी मृतांची संख्या 460 वर पोहोचली आहे. यामध्ये शहरातील 370 व बाहेरील 91 रुग्णांचा समावेश आहे.
11 मार्च ते 1 जुलैपर्यंत एकूण 77 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 2 जुलैपासून 31 जुलैपर्यंत 363 रुग्णांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार जुलै महिन्यात करोनाने रोज बाराहून अधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. रुग्णसंख्या वाढण्यासोबतच गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णही वाढत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी डॅशबोर्डनुसार शहरात गंभीर व सौम्य लक्षणे असणारे 732 रुग्ण इतके रुग्ण होते. तर अत्यवस्थ 110 रुग्ण आणि व्हेंटिलेटरवर 62 रुग्ण असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.