पिंपळे जगताप येथे तलावातून पाणीदार “मलई’

पाणी उपसा करून विक्री : शिरूर तहसीलकडून कारवाईबाबत टाळाटाळ

शिक्रापूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील जमीन गट नंबर 58 व 60 मधील शासकीय तलावच्या शेजारील व्यक्‍तींनी तलावावर अतिक्रमण करून तलावातील पाणी स्वतःच्या विहिरीमध्ये सोडून पाण्याची विक्री करीत आहे. तरी देखील प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पिंपळे जगताप हद्दीतील गायरान जमीन आहे. पाण्याच्या शासकीय तलावाशेजारील व्यतींनी तलावामध्ये अतिक्रमण करून तलावातील दगड, माती व मुरुमाचा बेकायदेशीरपणे उपसा केला आहे. यावेळी या व्यक्‍तींनी जमीन गट नंबर 58 मधील मुरूम, दगड व मातीची खोदाई केली आहे, तलावातील पाणी काहीजण बेकायदेशीरपणे स्वतःच्या विहिरीमध्ये घेतले आहे. या पाण्याची परिसरातील कंपन्यांमध्ये विक्री करीत असल्याबाबत यापूर्वी नागरिकांनी शिरूर तहसीलदार कार्यालयात तक्रार केली. त्यांनतर तहसीलदार यांनी मंडलाधिकारी कोरेगाव भीमा यांना या ठिकाणच्या पंचनाम्याचे आदेश दिले.

तलावाच्या बाजूला विहीर असून विहिरीशेजारी खड्डा असून त्या खड्डयातील पाणी पाइपच्या सहाय्याने विहिरीमध्ये सोडल्याचे दिसून येत असल्याबाबत लेखी पंचनामा मंडलाधिकारी यांनी तहसील कार्यालय येथे सादर केला आहे. महसूल विभागाने यावर कारवाई करणे गरजेचे असताना नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार व्हट्टे यांनी लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना याप्रकरणी तक्रार व पंचनामा देत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करत आवश्‍यक कागदपत्रे सोडून अहवाल सादर कार्याबाबतचे पत्र दिले आहे. परंतु प्रशासन कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लवकरच कारवाई केली जाईल -पुष्पा जगताप
पिंपळे जगताप येथील एका कंपनीने शासकीय तलावातील विहिरीतून पाणी पुरविले जात आहे. कंपनीचे सांडपाणी तळ्याच्या पाण्यात जात असल्यामुळे आम्ही या कंपनीला नोटीस दिलेली आहे. आज देखील हा प्रकार सुरूच असल्यामुळे आम्ही पुढील लवकरच कारवाई करणार असल्याचे सरपंच पुष्पा जगताप यांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)