पिंपळे गुरव परिसर १३ तास अंधारात

दापोडी – पिंपळे गुरव परिसरातील काही भागात तब्बल 13 तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. विविध विकास कामांतर्गत करण्यात आलेल्या खोदाई कामामुळे तसेच येथील एका विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणात बिघाड निर्माण झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे वितरण अधिकारी यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात विकसित झालेला परिसर म्हणून पिंपळे गुरवची ख्याती आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. रात्री 1 वाजता येथील साठ फुटी परिसरातील अनेक वसाहती तसेच भीमा शंकर कॉलनी, अभंग कॉलनी आदी परिसरात विद्युत पुरवठा
खंडित झाला.

पावसाळ्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या त्रासात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आणखीनच भर पडली. काही नागरिकांनी सांगवी वितरण विभागास या प्रकरणी तक्रार केली. तसेच स्थानिक लोक प्रतिनिधीकडेही या प्रकरणी तक्रार केली. पिंपळे गुरव परिसरात अनेक ठिकाणी विविध विकास कामे केली जात आहेत. विकास कामा करता खोदाई काम करताना विद्युत वितरणाच्या काही भुयारी केबल खराब झाल्यामुळे व पावसाचे पाणी त्यात शिरल्यामुळे केबल तुटल्यामुळे तसेच मधुबन फेडरर यंत्रणातही बिघाड निर्माण झाल्यामुळे येथील काही परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचे सांगवी वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता आर.एम.काळे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण करताना सांगितले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामास मोठा अडथळा निर्माण झाला होता. तब्बल 13 तासांच्या प्रदीर्घ वेळेनंतर मंगळवारी दुपारी 2 वाजता येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकामी वितरण विभागाला यश आले.

खोदाई कामे करताना संबंधितांनी वितरण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोदाई कामे केल्यास भुयारी केबल तुटल्याचे प्रकार टळतील तसेच त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्यासारख्या प्रकारास आळा बसेल अशी महत्वाची सूचना येथील रहिवाशी ऍड.बाजीराव दळवी यांनी यावेळी केली.

पाण्याविना नागरिकांचे हाल – 
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील नागरी वसाहत व सोसायट्या मधील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा जीवनावश्‍यक अशा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. पाण्याअभावी नागरिकांचे हाल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.