थरमॅक्स चौकातील मंगळवारी पहाटेची घटना
पिंपरी (प्रतिनिधी) – पिकअप व्हॅनला दोरखंड बांधून चोरट्यांनी आयसीआयसीआय बॅंकचे एटीएमच चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 9) पहाटे पिंपरी चिंचवडमधील थरमॅक्स चौक येथे घडली.
थरमॅक्स चौक येथील नवमी हॉटेलजवळ आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम आहे. मंगळवारी पहाटे चार ते पाच जण याठिकाणी पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधून एटीएम ओढून नेले. यामुळे धोक्याची सूचना देणारा सायरन वाजला. तरीदेखील चोरट्यांनी ओढून बाहेर आणलेले एटीएम गाडीत टाकून नेले.
सायरनचा आवाज ऐकून जवळच असणारा एक सुरक्षा रक्षक सावध झाला. त्याने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी धूम ठोकली होती.
पोलीस नियंत्रण कक्षाने आसपासच्या सर्व पोलिसांना याबाबत सूचना दिली. मात्र ही पिकअप व्हॅन कोणाच्याही हाती लागलेली नाही. बॅंकेने या एटीएममध्ये सात तारखेला दहा लाखांची रोकड टाकली होती. त्यापैकी एमटीएममध्ये किती रक्कम होती, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. यापूर्वी दोरखंड लावून एटीएम ओढून नेण्याची घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सध्या जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने या घटनेमागे पुणे जिल्ह्यातील टोळीचा हात असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे