गेहलोतांच्या ‘निकम्मा’ टीकेबाबत पायलट यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

जयपूर – काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण खाली घेतलं असून ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. बंड शमल्यानंतर आज प्रथमच सचिन पायलट यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी पायलट यांनी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली.

याबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्याविरोधात वापरल्या गेलेल्या शब्दांबाबत मला दुःख आहे. राजकारणामध्ये वावरत असताना शिष्टाचारांचे पालन करायला हवे. वैयक्तिक हेवेदावे विसरून आपण जनतेच्या भल्यासाठी योग्य असलेली धोरणे राबवायला हवीत. जे झालं ते भूतकाळ असून आता हे विसरायला हवं.”

तत्पूर्वी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्या बंडानंतर त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवताना त्यांचा उल्लेख ‘निकम्मा’ असा केला होता. मात्र गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर पायलट यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. याबाबत आज विचारले असता त्यांनी, “आपण त्यावेळीही याबाबत काही बोललो नव्हतो आजही बोलणार नाही. मात्र त्या शब्दांमुळे मला दुःख झालं.” अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, पायलट यांच्या घरवापसीमुळे त्यांना पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. याबाबत विचारले असता त्यांनी, “मी पक्षासमोर कोणतीही अट ठेवली नसून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे.” असे उत्तर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.