आमदाराची मागणी: राजस्थान कॉंग्रेसमधील धुसफूस थांबेना
जयपूूर: लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीनंतर राजस्थानच्या सत्तारूढ कॉंग्रेसमधील धुसफूस थांबण्याची चिन्हे नाहीत. आता त्या पक्षाच्या आमदाराने थेट अशोक गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे.
राजस्थानात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. त्यातील एकही जागा सत्ताधारी कॉंग्रेसला जिंकता आली नाही. त्या पीछेहाटीची जबाबदारी कुणी स्वीकारायची यावरून कॉंग्रेसमध्ये उखाळ्यापाखाळ्या सुरू झाल्या आहेत. स्वत: गेहलोत यांनी नुकतेच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पायलट यांना लक्ष्य केले. गेहलोत यांचे पुत्र वैभव यांनाही लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्याची जबाबदारी पायलट यांनी स्वीकारावी, असे वक्तव्य गेहलोत यांनी केले
. मात्र, गेहलोत यांची भूमिका कॉंग्रेसच्या काही नेत्यांना रूचली नाही. पक्षाचे आमदार पृथ्वीराज मीना यांनी गेहलोत यांचे वक्तव्य पक्षहिताचे नसल्याचे म्हटले. तेवढ्यावरच न थांबता मीना यांनी बुधवारी गेहलोत यांच्या जागी पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली. सत्तेत असताना पक्षाच्या होणाऱ्या पराभवाला मुख्यमंत्री जबाबदार असतात. पक्ष विरोधात असताना पराभवासाठी प्रदेशाध्यक्षांना जबाबदार ठरवता येऊ शकेल, असे त्यांनी म्हटले.