टायपिंग संस्थांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा होता प्रोजेक्ट
पुणे – राज्यातील शासकीय टायपिंग प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित हजेरी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हजेरीत वाढ व्हावी यासाठी पाच संस्थांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याबाबतचा पायलट प्रोजेक्ट राबविण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, संस्थांनी सकारात्मकता न दाखविल्यामुळे हा प्रोजेक्टच बारगळला आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी टायपिंगच्या परीक्षा घेण्यात येत असतात. या प्रशिक्षणासाठी किमान 80 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. राज्यातील एकाही टायपिंगच्या संस्थेत विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आलेली नाही. बहुसंख्य विद्यार्थी नियमितपणे हजेरी लावत नाहीत. विद्यार्थी कधी तरी संस्थेत जातात अन् थेट परीक्षेलाच बसतात. या कारभाराला आळा घालण्यासाठी संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने बायोमेट्रिक मशीन बसविण्यासाठी शासनाकडून बंधनकारक करण्यात येणार आहे हे उघडच आहे.
बायोमेट्रिक बसविण्यासाठी संस्थांना सूचना
शासनमान्य टायपिंग प्रशिक्षण संस्थांनी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. काही संस्थांनी यासाठी होकार दर्शविला होता. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणीच करण्यात आलेली नाही. या संबंधित संस्थांना पुन्हा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.