चिंबळी गावठाण हद्दीत डुकरांचा सुळसुळाट

उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त ः प्रशासनाचे दुर्लक्ष

चिंबळी – चिंबळी (ता. खेड) येथील गावठाण हद्दीमध्ये डुकरांचा सुळसुळाट झाला असून, दिवसेंदिवस त्यांचा उपद्रव वाढत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने ग्रामस्थांना कोणी वाली आहे का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गावठाण हद्दीत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचत असलेल्या घनकचऱ्यांवर डुकरे ताव मारीत आहेत. कचऱ्यातील अन्नावरून त्यांच्यात भांडणेही होत आहेत. त्यात सर्व कचरा इतरत्र पसरत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असल्याने विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. ही डुकरे भांडण करीत आजुबाजूच्या शेतात शिरून पिकांची नासधूस करीत आहेत.

पाहटे व रात्रीच्या सुमारास रस्त्यावर अडवी-तिडवी फिरून पायी चालणाऱ्यांसह दुचाकीस्वारांच्या पाठीमागे लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मोकाट फिरणाऱ्या डुकराचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या अनेक प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील कचरा ही एक मोठी समस्या चिंबळी आणि परिसरात नागरिकांना भेडसावत आहे. या साठणाऱ्या कचऱ्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाने आधी महत्त्वाचे पाऊल उचले गरजेचे आहे. जागोजागी वाढणाऱ्या कचऱ्यामुळे या भागात डुकरांची आणि भटक्‍या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढत आहे आणि त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

स्वच्छता अभियान राबवताना रस्त्यावर साठलेल्या कचऱ्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः ओला आणि सुका कचरा टाकण्याबाबत जनजागृतीची अजूनही या भागात गरज असल्याचे यावरून दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.