पुणे – मोकाट डुकरे आता महापालिकेची मालमत्ता असणार आहेत. संबंधित मालकांनी त्यांची डुकरे 23 ऑगस्टपूर्वी शहर हद्दीबाहेर घेऊन न गेल्यास ही डुकरे जप्त करण्यात येणार आहे. याबाबचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे. तर, ही डुकरे जप्त करण्यासाठीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून मुदत संपताच मोहीम तीव्र केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षात शहरातील मोकाट डुकरे आणि त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे मालमत्तांचेही नुकसन होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे मोकाट डुकरांवर कारवाईपूर्वी क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात काही व्यक्ती वराहपालन व्यवसायाच्या हेतूने करून त्यांना मोकाट सोडत असल्याचे समोर आले. तर, मोकाट डुकरांना आळा घालण्यासाठी अधिनियमातील तरतुदीनुसार मोकाट डुक्कर दिसल्यास ते मारण्याचे अधिकार महापालिकेस आहेत. तसेच आयपीसी कलमामध्येही नागरिकांच्या जीवितास धोका होईल, अशा वेळी फौजदारी कारवाई करण्याची तयारी आहे. या नियमांचा दाखला देत पालिकेने यापूर्वी संबंधितांना डुकरे शहराबाहेर नेण्यासाठी नोटीस बजाविली होती. त्यासाठी महिनाभर मुदतही देण्यात आली. मात्र, त्यानंतरही ही समस्या कमी झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने डुकरे जप्त करण्यापूर्वी डुक्कर व्यावसायिकांना नैसर्गिक न्याय मिळावा, यासाठी आणखी एक नोटीस दिली आहे.
ठेकेदार मोफत नेणार डुक्कर
ही डुकरे तपासण्यासाठी तामिळनाडू आणि कर्नाटकमधील काही ठेकेदार मोफत ही डुकरे पकडून देण्यास तयार आहेत. त्यांनी कोणत्याही खर्चाची मागणी केलेली नाही. त्यानुसार, पालिका या ठेकेदारांना काम देणार असून पकडलेली डुकरे राज्याच्या हद्दीबाहेर नेऊन या ठेकेदारांना द्यायची आहेत. या कारवाईसाठी विरोधाची शक्यता असल्याने पोलीस तसेच जिल्हा प्रशासनासही आवश्यक ते निर्णय तसेच पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पालिकेने केलेली आहे.