पुणे: चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या 18 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप दिमाखात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या “संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ या पुरस्कारावर यंदा “आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने मोहोर उमटवली. तर “अ सन’ या ट्युनिशियन चित्रपटाने “प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला. या पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.
दरवर्षी होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा दि. 9 ते 16 जानेवारी या कालावधीत हजारो चित्रपट रसिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला. या महोत्सवाचा समारोप शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ध्वनी दिग्दर्शक बिश्वदीप चॅटर्जी, महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, अभिजित देशपांडे, डॉ. मोहन आगाशे, एमआयटी-एटीडीच्या डॉ. सुनीता कराड, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांसह चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आलेले परीक्षक उपस्थित होते.
रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र हे “संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र हे “प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. सुजय डहाके दिग्दर्शित “तुझ्या आईला’ या चित्रपटाने परिक्षकांची पसंती पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा, सिनेमेटोग्राफी (छायांकन) आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार मिळाला. तर जागतिक चित्रपटामध्ये ट्युनिशियाच्या “अ सन’ या चित्रपटाने बाजी मारली.
याबरोबरच दरवर्षी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार यावर्षी अजित वाडीकर (वाय) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मुक्ता बर्वे (वाय) यांना ,सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार नियाज मुजावर (तुझ्या आईला) यांना तर सर्वोत्कृष्ट छायांकनासाठीचा पुरस्कार विजय मिश्रा (तुझ्या आईला) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये 25 हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
याबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात मेहडी बरसौई दिग्दर्शित “अ सन’ या चित्रपटासह, “सुपरनोवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक बर्तोज कृहलिक यांना गौरविण्यात आले. तर एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट’ पुरस्कार यंदा “मार्केट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप कुरबाह यांना हा प्रदान करण्यात आला. यासह आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा विभागातील पटकथा लेखनाचा परीक्षक विशेष पुरस्कार मायकल इडोव (द ह्युमरिस्ट), तर परिक्षक विशेष प्रमाणपत्र पुरस्कार “मारिघेल्ला’ या चित्रपटाला देण्यात आला. विद्यार्थी लघुपट पुरस्कार “अ पीस ऑफ होप’ या लघुपटाला तर लघुपट दिग्दर्शक पुरस्कार अलीरेझा घासेमी यांना प्रदान करण्यात आला.
यांनी पटकाविले आदिवासी लघुपट पुरस्कार
1) “द माइटी गोंट्स ब्रिक्स ऑफ चंदागड (दिग्दर्शक- विप्लव शिंदे)
2) “पडकाई’ (दिग्दर्शक – अमर मेलगीरी)
3) “रानी बेटी’ (दिग्दर्शक – धर्मा वानखेडे)