पिंपरी (प्रतिनिधी) – आगामी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाली असून आता 46 प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे आडाखे बांधण्यास सुरूवात झाली आहे. आरक्षणाची सोडत झाल्यानंतर विविध प्रभागातील इच्छुक चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आत्तापर्यंत अंतिम प्रभाग रचना, आरक्षण सोडत, प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्याही प्रसिध्द झाल्या आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शुक्रवारी ओबीसी आणि महिलांची आरक्षण सोडत झाली. त्यानंतर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसह मनसे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. प्रभागाचा क्रमांक, स्वतःचा फोटो, महापालिका इमारतीचा लोगो टाकून आपण इच्छुक असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल करण्यास सुरूवात झाली आहे.
दुसरीकडे शहरातील आजी-माजी मातब्बर नगरसेवकांच्या प्रभागात महिलांचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी त्यांनी आपल्या घरातीलच महिलेला निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.
प्रमुख पक्षांचे बहुतांश उमेदवार निश्चित!
2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता भाजपने उलथवून लावली. त्यानंतर भाजपचे शहरातील पक्ष संघटना मजुबत करण्यास प्राधान्य देऊन तळागळातील कार्यकर्त्यांना ताकद दिली. तसेच आगामी महापलिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
त्याचप्रमाणे महापालिकेत गेली पाच वर्ष विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या चुकीचा कारभारावर वेळोवेळी आसूड ओढत राष्ट्रवादीने चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. तर राष्ट्रवादीची ग्राऊंड लेवलला पक्षसंघटना चांगलीच मजबूत आहे. त्यादृष्टीने निवडणुक जिंकणारे त्या ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादीकडे आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने 100 पेक्षा जास्त नगरसेवकांचा नारा दिला असून काही प्रभागातील उमेदवारही निश्चित केल्याची चर्चा आहे.