नुआपाडा – ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यात राहणारा हेताराम सतनामी या शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीला ड्रोनद्वारे सरकारी पेन्शन त्याच्या घरी पोहचती करण्याचा एक आगळाच उपक्रम येथे राबवण्यात आला असून त्याचे कौतुक होत आहे. या अपंग इसमाला पेन्शन आणण्यासाठी दोन किमी लांब असलेल्या पंचायत कार्यालयात जावे लागते. या इसमाचे गाव घनदाट जंगलात आहे. त्याला दर महिन्याला हा त्रास सहन करावे लागत आहे. यावर गावच्या सरपंचाने ड्रोनचा उपाय शोधला आहे.
सरपंचांनी ऑन लाईन पद्धतीने ड्रोन विकत घेतला आणि या इसमाच्या पेन्शनची रक्कम त्याद्वारे त्याच्या भुतकापाडा गावात पोहोचवली. या बद्दल हेतारामने सरपंचांचे आभार मानले आहेत. त्याने म्हटले आहे की सरपंचाने ड्रोनच्या मदतीने पैसे पाठवले, हा माझ्यासाठी मोठा दिलासा आहे कारण घनदाट जंगलाने वेढलेल्या गावापासून पंचायत कार्यालय 2 किमी अंतरावर आहे, तेथे जाणे नेहमीच जिकीरीचे ठरते.
हेतारामला राज्य सरकारच्या मधुबाबू पेन्शन योजनेतून पेन्शन मिळत आहे. सरपंच सरोज अग्रवाल यांनी सांगितले की,हेतरामची ही अडचण लक्षात घेऊन आम्ही ड्रोनची उपाययोजना करण्याचे ठरवले.त्या म्हणाल्या की, इतर देशांमध्ये ड्रोनद्वारे वस्तू कशा पाठवल्या जातात हे मी पाहिले आहे. म्हणूनच मी ड्रोनची ऑर्डर दिली आणि त्याद्वारे पैसे त्याच्या दारात पोहोचवले.
नुआपाडाचे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) सुभेदार प्रधान म्हणाले की, सरपंच सरोज अग्रवाल यांच्या व्यक्तीगत पुढाकारानेच हे शक्य झाले आहे, कारण अशी सेवा देण्यासाठी अशी उपकरणे खरेदी करण्याची सरकारकडे तरतूद नाही. औषधे, पार्सल, किराणा सामान आणि खाद्यपदार्थ यासह विविध वस्तू वितरीत करण्यासाठी जगभरात ड्रोनचा वापर केला जात आहे, परंतु भारतात रोख रक्कम वितरित करण्यासाठी ड्रोनचा वापर हा पहिलाच उपक्रम ठरला आहे.