लिम्फोमातून बरे झालेल्यांनी शारीरिक तपासण्या चुकवू नयेत

डॉक्‍टरांचा सल्ला; कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे लिम्फोमा हे महत्त्वाचे कारण

सातारा  – लिम्फोमा या कॅन्सरची सुरुवात रोगप्रतिकारक यंत्रणेतील प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या पेशींपासून होते. या पेशींना लिम्फोसायटिस म्हणतात. या पेशी लसिका गाठी (लिम्फ नोडस्‌), प्लीहा (स्प्लीन), उरोधिष्ठ ग्रंथी (थायमस), अस्थिमगजात (बोन मॅरो) आणि शरीराच्या अन्य भागांमध्येही आढळतात. नॉन हॉजकिन (एनएचएल) आणि हॉजकिन, हे लिम्फोमाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. भारतात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे नॉन हॉजकिन लिम्फोमा हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे लिम्फोमातून बरे झालेल्यांनी त्यांच्या डॉक्‍टरांच्या अपॉइंटमेंटस्‌ व शारीरिक तपासण्या चुकवू नयेत, असा सल्ला ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सिद्धेश त्र्यंबके यांनी दिला आहे.

डॉ. त्र्यंबके म्हणाले, एपस्टाइन-बार विषाणूचा प्रादुर्भाव, त्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्‍वभूमी, मंदावलेली रोगप्रतिकारक यंत्रणा, यामुळे लिम्फोमा होण्याचा धोका अधिक असतो. लसिका ग्रंथींना सूज, धाप लागणे, खोकला, पोटावर सूज येणे किंवा वेदना होणे, ताप, मद्यपान केल्यावर पोटात दुखणे, रात्री खूप घाम किंवा थंडी वाजून येणे, विनाकारण वजन घटणे आणि हाडांमध्ये वेदना यासारखी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. लिम्फोमावर उपचार करण्यासाठी प्रत्येक राज्यात सेंटर ऑफ एक्‍सलन्स, एनएचएल व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज आहे. लिम्फोमाची शंका आल्यास संपूर्ण रक्‍तचाचणी व अन्य चाचण्या करून घ्याव्यात. पेट सीटी, बोन मॅरो व आयएचसी या चाचण्यांतून लिम्फोमाचे निदान होते. लिम्फोमाचे निदान झाल्यास, त्याचा प्रकार, जागा निश्‍चित करणे, ही त्याचा टप्पा ठरवण्यातील निर्णायक बाब आहे. त्यावरच उपचार ठरवले जातात. किमोथेरपी हा लिम्फोमासाठी दिला जाणारा उपचार आहे.

यामध्ये इंजेक्‍शनद्वारे औषधे नसांमध्ये सोडली जातात. किमोथेरपीमुळे रुग्णाचे केस गळू शकतात. मळमळ, भूक न लागणे, थकवा येणे असा त्रास जाणवू शकतो. उपचार पूर्ण झाले की, हे सर्व साइड इफेक्‍टस्‌ सहसा नाहीसे होतात. रेडिएशन उपचारही दिले जातात. उच्च ऊर्जेचे किरण वापरून कॅन्सरयुक्त पेशी नष्ट केल्या जातात. लिम्फोमा शरीराच्या एकाच भागात पसरला असेल तर हे उपचार अधिक कार्यक्षमपणे दिले जातात. इम्युनोथेरपीमध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक यंत्रणा सचेतन करण्यासाठी औषधांचा उपयोग केला जातो. किमोथेरपी व रेडिएशन थेरपी अपयशी ठरल्यास स्टेम सेल ट्रान्सप्लांट (एससीटी) ही उपचार पद्धती वापरली जाते. सर्व उपचार पूर्ण झाल्यानंतरही रुग्णाला पुन्हा ल्युकेमिया, वंध्यत्व, स्तनांचा कॅन्सर, थायरॉइड, फुप्फुसांचा कॅन्सर, हृदयविकार, मायेलोडिसप्लास्टिक सिंड्रोम, असे विकार होऊ शकतात. त्यामुळे लिम्फोमातून बरे झालेल्यांनी त्यांच्या शारीरिक तपासण्या नियमित करून घ्याव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.