पुणे : महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि याची स्थापना महाराष्ट्र आणि देशात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी त्याकाळी केली. संयुक्त राष्ट्रसंघ आज जगामध्ये हेच मानवी मूल्य रुजविण्याचे काम करतोय. ते काम या दाम्पत्याने त्या काळी केले, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रवींद्र शिंगणापुरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ. सागर वैद्य, ज्योत्स्ना एकबोटे, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारूशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या कार्याला जसा सर्व जाती जमातीमधील काही लोकांचा विरोध होता, तसेच या कार्यात त्यांना मदत करणारे लोकही सर्व समाजातील होते. त्यामुळे समाजात वैचारिक सहिष्णुता निर्माण होणे गरजेचे आहे, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.